ओळखीच्याच व्यक्तींचे कृत्य असल्याचा संशय, एकजण ताब्यात
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एका 17 वर्षे वयाच्या अल्पवयीन युवतीवर भररस्त्यात ऍसिड फेकले गेल्याची घटना दिल्लीच्या द्वारका जिल्हय़ात घडली आहे. दोन युवकांनी बाईकवरुन येऊन रस्त्याकडेला थांबलेल्या या युवतीवर ऍसिडफेक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे युवक त्या युवतीच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या ओळखीचे असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. एकाला ताब्यात घेण्यात आले असून मुख्य आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके धाडण्यात आली आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.
हा प्रकार घडला तेव्हा पिडित युवती तिच्या धाकटय़ा बहिणीसह रस्त्याच्या कडेला उभी होती. बुधवारी सकाळी 10 च्या आसपास दोन युवक बाईकवरुन आले आणि मागे बसलेल्या युवकाने या युवतीवर ऍसिड फेकले. या हल्ल्यात ती जखमी झाली असून आता तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. ऍसिड फेकीची घटना पहिलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन ही माहिती दिल्याने त्वरित तपासाची चपे फिरविण्यात आली.
बाईकचा शोध घेण्यात यश
सीसीटीव्ही फुटेजवरुन बाईक आणि ती चालविणाऱयाचा शोध लागला आहे. त्यामुळे बाईक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर मुख्य आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. पिडीत युवती 8 टक्के इतक्या प्रमाणात भाजली आहे. तिच्या चेहऱयावर ऍसिडचे काही शिंतोडे उडाले आहेत. तिच्यावर तातडीने उपचार करण्यात येत असून आता ती सावरली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ती बोलण्याच्या परिस्थितीत आल्यानंतर तिचे म्हणणे नोंद करुन घेतले जाणार आहे. द्वारका जिल्हय़ाचे पोलीस उपायुक्त एम. हर्षवर्धन स्वतः तपासाचे सूत्रसंचालन करीत आहेत. लवकरच मुख्य आरोपीला ताब्यात घेतले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. हे आरोपी अल्पवयीन आहेत की सज्ञान आहेत हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. पकडलेल्या आरोपीची चौकशी सुरु आहे.
केजरीवाल यांची प्रतिक्रिया
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनसंबंधी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेचा लवकरात लवकर तपास करावा आणि आरोपींना कठोर शिक्षा केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. गुन्हेगारांना असे कृत्य करण्याचे धाडस कसे होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
महिला आयोगाकडून दखल
या प्रकरणाची दखल दिल्लीच्या महिला आयोगाकडून घेण्यात आली आहे. आयोगाच्या अध्यक्ष स्वाती माहेश्वरी यांनी पिडीत अल्पवयीन युवतीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. खुल्या ऍसिड विक्रीवर दिल्लीत त्वरित पूर्ण बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी दिल्ली सरकारकडे केली आहे.
पालकांनी दिली माहिती
युवतीच्या अंगावर ऍसिड फेकल्यानंतर दोन्ही युवक बाईकसह पळून गेले. या युवतीच्या धाकटय़ा बहिणीने घरी येऊन ही माहिती पालकांना दिली. दोन्ही युवकांनी त्यांचे चेहरे झाकले होते. त्यामुळे त्वरित त्यांची ओळख पटू शकली नाही. मात्र, ते या कुटुंबाच्या ओळखीचे आहेत, असे वाटत आहे. संशयितांची नावे पोलिसांना देण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजचाही उपयोग करण्यात आला आहे. पोलीस वेगाने तपास करीत असून पिडीत युवतीच्या कुटुंबियांचे तपासात सहकार्य मिळत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.