प्रशिक्षणाला आलेल्या दोन जवानांच्या रायफलींची चोरी
प्रतिनिधी /बेळगाव
हालभावी (ता. बेळगाव) येथील आयटीबीपी कॅम्पमधून दोन एके-47 रायफली चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. बेळगाव ग्रामीणचे एसीपी एस. व्ही. गिरीश यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आयटीबीपीच्या अधिकाऱयांनी यासंबंधी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. बुधवारी 17 ऑगस्ट रोजी चोरीची घटना उघडकीस आली असून पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी आयटीबीपी कॅम्पला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे.
चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाचा वापर करण्यात आला आहे. एसीपी एस. व्ही. गिरीश, काकतीचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. प्रशिक्षणासाठी मदुराई येथून बेळगावला आलेल्या राजेशकुमार व संदीप मीना या जवानांच्या एके-47 चोरीला गेल्या आहेत.
नक्षल विरोधी कारवाईचे प्रशिक्षण घेण्यासाठी हे जवान हालभावी येथील आयटीबीपी कॅम्पमध्ये आले आहेत. 29 जुलैपासून हे प्रशिक्षण सुरू आहे. 12 सप्टेंबरपर्यंत ते चालणार आहे. प्रशिक्षणासाठी आलेल्या जवानांच्या राहण्याची व्यवस्था आयटीबीपी कॅम्पमधील इमारतीत तिसऱया मजल्यावर करण्यात आली आहे.
तिसऱया मजल्यावरील बराकीतून रायफलींची चोरी
तिसऱया मजल्यावरील बराकीतून रायफलींची चोरी झाली आहे. या कॅम्पमध्ये नागरिकांना प्रवेश नाही. तरीही चोरीचा प्रकार कसा घडला? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांबरोबरच आयटीबीपीचे अधिकारीही त्या रायफलींचा शोध घेत आहेत. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.