Tarun Bharat

मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई ः उशिरा सूचलेले शहाणपण…

झुआरी पुलावरून कार समुद्रात पडून चार जणांचा बळी गेला अन् प्रशासन खडबडून जागे झाले. दारू पिऊन वाहन चालविल्याने अपघात होतात, हे सरकारच्या लक्षात आले आणि सरकारने दारू पिऊन वाहन चालविणाऱयांवर कडक कारवाई करण्याचे फर्मान सोडले. पोलीस अधिकाऱयांनी पत्रकार परिषदा घेऊन त्याची कल्पना वाहन चालकांना दिली. खास करून दारू पिऊन वाहन चालविणाऱयांना तो संदेश होता. सरकारने हाच निर्णय जर यापूर्वी अंमलात आणला असता तर कितीतरी जणांचा जीव वाचला असता. कितीतरी जण कायमस्वरुपी जायबंदी होण्यापासून बचावले असते. कितीतरी संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचले असते. उशिरा हा होईना, सरकारला शहाणपण सूचले, असेच म्हणावे लागेल.

मुळात दारू पिऊन वाहन चालविणे, हा गुन्हाच आहे पण पोलीस अशा गोष्टींकडे का दुर्लक्ष करीत होते? चार जणांचा बळी गेल्यानंतरच पोलिसांना किंवा सरकारला का जाग आली. त्यापूर्वी त्यांना कारवाई करण्यासाठी कोणी रोखले होते. यापूर्वी दक्षिण गोव्यात कोलवा रोडला असाच एक भीषण अपघात झाला होता. त्यात दोघा पोलिसांचा बळी गेला होता. खरेतर त्याच दिवसापासून मद्यपी वाहन चालकांच्या विरोधात कडक कारवाई होणे अपेक्षित होते मात्र दोघा पोलिसांचा बळी जाऊनदेखील पोलिसांनी कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे.

रात्रीच्यावेळी पुलावरून कार समुद्रात पडल्याने चार जणांचा बळी गेला. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी होताच. चार जणांचा बळी गेला. ते सर्वजण त्याचदिवशी एका बर्थ डे पार्टीत होते. त्या बर्थ डे पार्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यात दारूच्या बाटल्या स्पष्टपणे दिसत होत्या. त्यानंतर या अपघाताला कारण काय असावे, हे सर्वांच्या लक्षात आले.

मंगळवारी पहाटे दक्षिण गोव्यात नागमोडे-नावेली येथे झालेल्या अपघातात दुबईहून गोव्यात आलेल्या चिंचणी येथील दोघांचा, चालकाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. दुबईहून गोव्यात येणाऱया कुटुंबाला आणण्यासाठी मध्यरात्री कार दाबोळी विमानतळाकडे गेली व परत येत असताना पहाटे हा अपघात झाला. कार चालकाची झोप पूर्ण झाली नव्हती. त्याला कार चालविताना डोळा लागला व हा अपघात घडला. जर चालकाने झोप येत असल्याने वाटेत कुठेतरी थोडावेळ गाडी थांबवून विश्रांती घेतली असती तर कदाचित हा अपघात टळला असता. दुबईहून गोव्यात परतलेल्या दोघांचा जीव वाचला असता. या अपघाताने गोव्यात अपघाताचे सत्र थांबले नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.   

खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी, रात्रीच्यावेळी दारू पिऊन वाहन चालविल्याने अपघात होत असल्याचे विधान केले. मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री असल्याने पोलीस खात्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱयांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्या अगोदर वाहन चालकांना सतर्क करण्यासाठी पोलीस अधिकाऱयांनी पत्रकार परिषदा घेतल्या. दारू पिऊन वाहन चालविताना सापडल्यास थेट कारवाई करणार असल्याचा इशारा दिला.

मद्यपी वाहन चालकांवर कारवाई होईल. त्याचबरोबर जे युवक वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालवितात, त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले. त्यांच्या पालकांवरच गुन्हा नोंद केला जाणार आहे. पोलिसांनी थेट कारवाई करण्याचा इशारा दिल्याने काही दिवस दारू पिऊन वाहन चालविण्याचे प्रकार बंद होतील तसेच वाहन चालविण्याचा परवाना नसलेले युवक वाहन घेऊन रस्त्यावर येणार नाहीत. त्यामुळे काही प्रमाणात अपघात टळतील, असे गृहित धरता येईल पण पोलिसांनी आपल्या कारवाईत सातत्य राखणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. ही कारवाई केवळ चार-पाच दिवसांपुरती किंवा चार-पाच महिन्यांपुरती मर्यादित न ठेवता, ती कायमस्वरुपी राहावी, जेणेकरून सर्वांना कारवाईची भीती राहील.

गोव्यात रस्ते अपघातांची संख्या कमी पण…

गोव्यातील रस्ते अपघातांची संख्या कमी झाली असली तरी देशात अपघातांचे सर्वाधिक प्रमाण गोव्यात कायम आहे. इतर कोणतेही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश दर लाख लोकसंख्येच्या 109.4 अपघातांच्या आकडय़ाच्या जवळ आलेला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात दर लाख लोकसंख्येमागे 27.6 अपघातांच्या राष्ट्रीय सरासरीच्या चौपट आहे.

गोव्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्यांची तीव्रता मागील वर्षीपेक्षा जास्त आहे. गोव्यात सर्वाधिक अपघात हे नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे झाल्याचे अहवालात म्हटले आहे. ओव्हरस्पीडिंग हे प्रथम क्रमांकाचे कारण होते. परिणामी 1,845 अपघात (आणि 42 मृत्यू), त्यानंतर चुकीच्या बाजूने वाहन चालविणे, ज्यामुळे 229 अपघात (नऊ मृत्यू) झाले. राज्यात हेल्मेट न घातल्याने 90 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार आहे.  प्राणघातक अपघातांपैकी 55 अपघात हे समोरासमोर आदळल्यामुळे झाले. त्यात बहुतेक (133) दुचाकी वाहनांचा समावेश होता तर मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 29 पादचारी होते. बहुतांश अपघात हे हवामान स्वच्छ असताना झाल्याचे अहवालात म्हटले आहे. रस्त्यावरील खड्डय़ांमुळे अपघात झाल्याची नोंद देखील या अहवालात घेण्यात आली आहे. ज्या वाहनांना अपघात झाले, ती वाहने दहा वर्षांपेक्षा जास्त जुनी नव्हती. त्यामुळे वाहनांची परिस्थिती वाईट होती, असे म्हणता येत नाही तर अपघाताला वाहनचालक जबाबदार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

महेश कोनेकर

Related Stories

भावनिक साक्षरतेसाठी…

Patil_p

कोकणातील आरोग्य सेवेच्या मर्यादा उघड

Patil_p

असो ऐसें हरिसंतान

Patil_p

मंत्रिपदाच्या नाराजीने आ.दीपक केसरकरांचीच कोंडी

Patil_p

पूजस्थाने – वैष्णव आणि आकाश

Patil_p

कृषी-वित्त व्यवस्थेची पुनर्रचना

Patil_p