पतीची लडाख तर पत्नीची अरुणाचलमध्ये बदली ः दोन्हीमधील अंतर 3100 किमी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजधानी दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममधून क्रीडापटूंना घरी पाठवून स्वतःचा पाळीव श्वान तेथे फिरविणे आयएएस दांपत्याला चांगलेच महागात पडले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी रात्री उशिरा आयएएस संजीव खिरवार आणि त्यांची पत्नी रिंगू डुग्गा यांची एकाचवेळी बदली केली आहे. खिरवार यांची लडाखमध्ये तर डुग्गा यांची नियुक्ती अरुणाचल प्रदेशमध्ये करण्यात आली आहे. लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंतचे अंतर सुमारे 3,100 किलोमीटर इतके आहे.
संजीव खिरवार हे 1994 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते दिल्लीत महसूल आयुक्त या पदावर नियुक्त होते. स्टेडियममधील क्रीडापटूंना सराव करण्यापासून रोखण्याचा प्रकार समोर आल्यावर दिल्ली आणि केंद्र सरकारची चांगलीच फजिती झाली होती. याचमुळे गुरुवारी रात्री उशिरा आयएएस दांपत्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मुख्य सचिवांकडून मागविला अहवाल
केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेत दिल्लीच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागविला होता. मुख्य सचिवांनी स्वतःचा अहवाल मंत्रालयाला सोपविल्यावर सरकारने आयएएस दांपत्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारचे उपसचिव राकेश कुमार सिंह यांनी आयएएस दांपत्याला तत्काळ प्रभावाने नव्या ठिकाणी रुजू होण्याचा आदेश दिला आहे.
अधिकाऱयाचे स्पष्टीकरण
या पूर्ण प्रकरणी खिरवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझ्यामुळे क्रीडापटूंचा सराव थांबल्याचा दावा चुकीचा आहे. मी कधीतरी श्वानासोबत ट्रकवर जात होतो. क्रीडापटू तेथे नसतानाच जात होतो. कुठल्याही क्रीडापटूला कधीच स्टेडियमबाहेर जाण्यास सांगितले नव्हते असा दावा खिरवार यांनी केला आहे.
केजरीवाल सक्रीय
तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शहरातील सर्व शासकीय क्रीडाकेंद्रांना रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्देश दिला आहे. आयएएस जोडप्याचे कृत्य समोर आल्यावर राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे.