राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सूचना
बेळगाव : परवानगी न घेता कोणत्याही प्रकारचे बॅनर किंवा पोस्टर्स लावता येणार नाहीत. जर कोणीही पोस्टर्स किंवा बॅनर्स लावत असतील तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल करावा, अशी सक्त ताकीद राज्याचे निवडणूक अधिकारी मनोजकुमार मीना यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यातील निवडणूक अधिकाऱ्यांशी त्यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही सूचना केली आहे. मतदारांना आमिष दाखविणे हा मोठा गुन्हा असून अशा प्रकरणांमध्ये नियमानुसार कारवाई करा. भेटवस्तू, वर्गणी, सामूहिक भोजनाची व्यवस्था केलेल्यांवर कारवाई करावी, अशी सूचना केली आहे. दारूची बेकायदेशीर वाहतूक तसेच कोणीही साठा करून ठेवला असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या सीमेवर तसेच इतर राज्यांच्या सीमेवर चेकपोस्ट स्थापन करून त्याठिकाणी कडक तपासणी करावी, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मार्गसूची तयार करा, तसेच पथके कार्यान्वित करावी, अशी सूचना मनोजकुमार मीना यांनी केली आहे.
मतदानाविषयी जनजागृती करणेदेखील महत्त्वाचे आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मतदान केंद्रांवर पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) वापराबाबत जनजागृती करणे, प्रात्यक्षिकांचे आयोजन करून त्यांना या यंत्राबाबतची संपूर्ण माहिती देणे गरजेचे आहे, असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी यावेळी सांगितले. आचारसंहिता अद्याप लागू नसली तरीही विद्यमान नियमानुसार आमिषे दाखविणाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठक यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शहर तसेच जिल्ह्यातील अनधिकृत बॅनर्स, पोस्टर हटविण्यात येत आहेत, अशी माहिती दिली. या व्हिडिओ कॉन्फरन्सला पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोवर, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर तातडीने जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि बॅनर्स, पोस्टर्स, भित्तीपत्रके तत्काळ हटवावीत, असे यावेळी स्पष्ट केले.