प्लास्टिक जप्त : पंधरा हजार रुपयांचा दंड वसूल : आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांची माहिती
सातारा/प्रतिनिधी
राज्य शासनाने दिलेल्या नियमानुसार सातारा पालिकेने पुन्हा एकदा प्लास्टिक बंदीची कारवाई सुरू केलेली आहे. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी सातारा शहरातील रविवार पेठेतील तीन दुकानदारावर प्लास्टिक वापराबाबत कारवाई करण्यात आली. तब्बल 15 हजार रुपयांचा दंड करून त्यांच्याकडून प्लास्टिक हस्तगत करण्यात आले, अशी माहिती सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांनी दिली.
सातारा शहरात प्लास्टिक बंदी चा नियम पाळण्यात यावा व्यापाऱ्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या ऐवजी कापडी पिशव्या वापराव्यात असे आवाहन सातारा पालिकेच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. तरीही सातारा शहरातील व्यवसायिक व व्यापारी हातगाडीवाले हे सर्रास प्लास्टिकच्या पिशव्या वापरताना दिसतात. त्याबाबतच्या अनेक तक्रारी सातारा पालिकेकडे आलेले आहेत. त्या अनुषंगाने पालिका प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नव्हते. दरम्यान, शासनाने ही 1 जुलैपासून मोहीम राबवण्याचे निर्देश त्या त्या पालिका प्रशासनाला दिलेले आहेत. त्यानुसार सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी आरोग्य विभागाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांनी रविवार पेठेतील दुकानदारावर कारवाई केली. त्यात एचबी टॉवर येथील भैरवनाथ कलेक्शन, हरियाणा हँडलूम आणि युनिव्हर्सल होजिअरी यांना प्रत्येकी 5 हजार दंड करण्यात आला.