मडगाव नगरपालिकेकडून 4 पेटय़ा मासे जप्त
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेने मंगळवारी सायंकाळी माडेल येथील घाऊक मासळी मार्केटबाहेर बेकायदा किरकोळ मासेविक्री करणाऱयांवर कारवाई करून 4 पेटय़ा मासे जप्त केले. नंतर सदर माशांची सोनसडय़ावरील कचरा यार्डात नेऊन विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती मार्केट निरीक्षक सांतो फर्नांडिस यांनी दिली.
नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांच्याकडे या बेकायदा मासेविक्रेत्यांबद्दल वाढत्या तक्रारी आल्या होत्या. काल सायंकाळी नगराध्यक्षांनी अचानक मार्केट निरीक्षकांना बोलावून ही कारवाई राबविली. यावेळी ते स्वतः तसेच नगरसेवक फ्रान्सिस जोनास, मार्केट निरीक्षक फर्नांडिस, शेखर गावकर व पालिकेचे कामगार उपस्थित होते. जप्त केलेले मासे नासलेल्या स्थितीतील होते. त्यामुळे त्यांची सोनसडा कचरा यार्डात विल्हेवाट लावण्यात आल्याचे फर्नांडिस यांनी सांगितले.
याशिवाय पालिकेने बोर्डा येथील रस्त्यावर बेकायदा फळविक्री करणाऱयांकडून सफरचंदाच्या चार पेटय़ा जप्त केल्या. सदर सफरचंदे सोनसडा परिसरातील मातृछायाला देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मडगाव पालिकेकडे पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी बेकायदा व्यवसाय चालल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत. त्यामुळे सदर मोहीम सुरूच राहणार असल्याचे मार्केट निरीक्षक फर्नांडिस यांनी सांगितले.