अन्य बेकायदा व्यावसयानांही म्हाऊस पंचायतीकडून नोटिसा जारी : भाडेकरूंची माहिती देण्याचे घरमालकांना आदेश
प्रतिनिधी /वाळपई
म्हाऊस-नागवे येथे सुरू असलेला बेकायदा भंगार अड्डा पंचायतीने नोटीस देऊन बंद केला. या भंगार अड्डय़ासह इतर बेकायदा व्यवसाय करणाऱयांना पंचायतीने नोटाशी जारी केल्या असून काम ताबडतोब बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत.
नागवे सत्तरी येथे गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या भंगार अड्डय़ांवर बांगलादेशी घुसखोर आढळून आले होते. दहशतवादी विरोधी पथकाने सदर ठिकाणी धाड घालून बिलाल अन्वर आखोन याला अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर भागांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर अड्डय़ांवर पंचायत दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
म्हाऊस पंचायतीने या भंगार अड्डय़ाला कायदेशीर नोटीस देऊन अड्डा बंद करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे याच अड्डय़ाच्या बाजूचे लाकडी वस्तू व सिमेंटच्या वस्तू तयार करण्यात येणाऱया प्रकल्पा विरोधातही पंचायतीने आदेश जारी केलेला आहे.
संपूर्ण बेकायदेशीर अड्डे व उभारण्यात आलेल्या शेड्स हटविण्यात येण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. अन्यथा सर्व शेड्स जमीनदोस्त करण्याचा इशारा पंचायतीने दिलेला आहे.
पंचायतीने जारी केलेल्या नोटिशीची दखल घेऊन सदर भागातील बेकायदेशीर भंगार अड्डा व इतर व्यवसाय बंद करण्यात आलेले आहेत. एकूण पंचायतीने केलेली धडक कारवाई याचे स्थानिकांनी स्वागत केले आहे. भविष्यात अशा व्यवसायिकांना परवाने देऊ नयेत, अशा प्रकारची मागणी म्हाऊस पंचायत क्षेत्रातील नागरिकांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी नागवे येथे झालेल्या स्थानिकांच्या बैठकीत बेकायदा व्यवसायाविरोधात तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर पंचायतीने घेतलेल्या कडक भूमिकेचे नागरिकांनी स्वागत केले असून पुन्हा असे बेकायदेशीर व्यवहार या भागांमध्ये सुरू होणार नाहीत याची विशेष काळजी घेण्यात यावी अशा प्रकारची मागणी स्थानिकांनी केलेली आहे.
दरम्यान पंचायत क्षेत्रामध्ये राहणाऱया भाडकरूंसंदर्भात सविस्तर माहिती पंचायतीला पंधरा दिवसांत सादर करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा पंधरा दिवसानंतर याबाबत सर्वेक्षण करून भाडेकरूंना ठेवणाऱया घरमालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पंचायतीने दिला आहे.