Tarun Bharat

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांना चित्रपटसृष्टीतील मान्यवरांची श्रद्धांजली ; आठवणींना उजाळा

प्रतिनिधी,कोल्हापूर
भालचंद्र कुलकर्णी केवळ अभिनेते नव्हते तर त्यांनी शिक्षक म्हणून विद्यार्थी घडविले, आपल्या आवाजाचा वापर केवळ स्वत:साठी न करता तो इतरांनाही दिला. अभिनय असो वा सूत्रसंचालन असे त्यासाठी आवश्यक आवाजातील चढउताराचे धडेही त्यांनी दिले. मराठी भाषेवर असलेल्या प्रभृत्वाचा वापर त्यांनी अभिनय, शिक्षणाबरोबरच लिखनासाठीही केला. व्यक्तीमत्वात साधेपणा जपत त्यांनी शिक्षकी बाणा जपत शेवटपर्यंत मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली, अशा शब्दात भालचंद्र कुलकर्णी यांच्या व्यक्तीमत्वातील अनेक धागे आणि आठवणी मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर आणि त्यांच्या स्नेहीजनांनी जागवल्या. त्यातील काही निवडक आठवणी प्रतिक्रियेच्या रूपाने.

चित्रपट सृष्टीचा महत्वाचा तारा निखळला
चित्रपट सृष्टीत गेल्या 50 वर्षापासून आम्ही एकत्र काम केले. आम्ही दोघांनी 18 चित्रपट एकत्र केले. चित्रपट महामंडळाचा मी अध्यक्ष असताना ते सचिव होते त्यामुळे 10 वर्षे आम्ही एकमताने निर्णय घेतले. ते अभिनेते लेखक, साहित्यिक असल्याने आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या रूपाने चित्रपट सृष्टीतला तारा निखळला. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीतील पोकळी कधीच भरून निघणार नाही.
भास्करराव जाधव, ज्येष्ठ दिग्दर्शक

शिष्याला गुरू मानणारा अभिनेता
भालचंद्र कुलकर्णी सरांमुळे अभिनय क्षेत्रात मी भरारी घेऊ शकलो. दरवर्षी गुरू पौर्णिमेला त्यांचा आर्शीवाद घेण्यासाठी जात असतो. त्यावेळी ते प्रेम हंगामी करू नका, भेटत जा असे म्हणायचे, माझ्या कामाचे कौतुकही करायचे. शिष्याला गुरू मानणारा अभिनेता आपण गमावला आहे.
नितीन कुलकर्णी, हास्य अभिनेता.

चांगला अभिनेता गमावला
कुलकर्णी यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते. त्यांच्या हाताखाली अनेक कलाकार घडले.नवीन पिढीसमोर आदर्श असणारा अभिनेता कोल्हापुरने गमावला. अशा अभिनेत्याला भावपूर्ण श्रध्दांजली.
अर्जुन नलवडे, सदस्य, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ

कुलकर्णीसरांमुळे बाल शिवाजीत भूमिका मिळाली
प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शिकत असताना भालचंद्र कुलकर्णी सरांशी नाते जुळले. त्यांच्यामुळे बाल शिवाजी या ऐशीच्या दशकात गाजलेल्या मराठी चित्रपटात म्हमद्याची भूमिका करू शकलो.
-संजय तोडकर, अभिनेता, निर्माता

आवाजाची देणगी
भालचंद्र कुलकर्णी सरांना आवाजातील देणगी लाभली होती. त्याचा वापर त्यांनी अभिनयात केला.गणेशोत्सवात भूमिका साकारणाऱ्या स्थानिक कलाकरांना अभिनयाचे धडे देण्याबरोबरच आवाजातील चढउताराचे शिक्षण ते देत असत.
-विश्वराज जोशी, कलाकार

कुलकर्णीसरांमुळे अभिनयाची प्रेरणा
भालचंद्र कुलकर्णी सरांचा माझा जुना स्नेह. त्यांच्याकडून अभिनयाची प्रेरणा मिळाली. त्यातून अनेक मराठी चित्रपटात भूमिका केल्या. सरांचे जाणे मनाला वेदना देणारे.
-नथानियल शेलार उर्फ ज्युनिअर धुमाळ, ज्येष्ठ कलाकार

कलामार्गदर्शक हरपला
चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद असो की कला क्षेत्रातील अनेक कार्यक्रम असो, सर्व ठिकाणी माझे पितृतूल्य मार्गदर्शक म्हणून भालचंद्र कुलकर्णी यांनी भूमिका बजावली. चित्रपट सृष्टीसह माझा कलामार्गदर्शक हरपला. चित्रपट महामंडळाचा विकास हीच त्यांना खरी श्रध्दांजली.
मेघराज राजेभोसले (अध्यक्ष, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ )

जुन्या कलावंताच्या पिढीचे शेवटचे नेतृत्व हरपले
कुलकर्णी यांच्या रूपाने चित्रपट सृष्टीतील 50 वर्षाची कारकिर्द असणारे अभिनेते, नाट्या संवाद लेखक काळाच्या पडद्याआड गेले आहेत. मराठीचे शिक्षक असलेल्या कुलकर्णी यांनी अनेक विद्यार्थी घडवले. कलेची उपासणा करणारा कलावंत आणि शेवटच्या पिढीचे नेतृत्व करणारा कोल्हापूर चित्रपट सृष्टीचा चालता-बोलता इतिहास हरपला. याचे दु:ख आहे.
डॉ. कविता गगराणी (चित्रपट अभ्यासक)

आळतेतून सुरूवात, शेरास सव्वाशेर आणि एक गाव… मधील गावडेअण्णा
भालचंद्र कुलकर्णी यांच्या अभिनयाची सुरूवात त्यांच्या आळते गावातून झाली. महान गीतकार जगदीश खेबुडकर यांचे ज्येष्ठ बंधू दिग्दर्शक दत्ता खेबुडकर यांचे कुलकर्णी यांना मार्गदर्शन लाभले. नाटकाबरोबर नभोवाणीवर काम करत कुलकर्णी शिक्षकी पेशाकडे वळले. ती जबाबदारी पार पाडत त्यांनी मराठी चित्रपटात भूमिका साकारण्यास सुरूवात केली. 1966 मध्ये त्यांनी राजा गोसावी अभिनित आणि दत्ता माने दिग्दर्शीत शेरास सव्वाशेर चित्रपटातून गोसावी यांच्या मित्राची भूमिका केली. तो त्यांचा पहिला चित्रपट. एक गाव बारा भानगडी या चित्रपाटात झेंडे अण्णांच्या बरोबरीने कुलकर्णींनी साकारलेली गावडे अण्णांची भूमिकाही तितकीच गाजली होती, अशी आठवण ज्येष्ठ सूत्रसंचालक, मराठी चित्रपट, साहित्याचे अभ्यासक पंडीत कंदले यांनी सांगितली.

तुकाराम महाराज आणि दख्खनचा राजा जोतिबा
व्ही. शांताराम यांच्या प्रभात कंपनीने पूर्वीच्या काळी संत तुकाराम चित्रपट काढला होता. त्यामध्ये विष्णूपंत पागनीस यांनी संत तुकारामांची भूमिका साकारली होती. जनमाणसावर पागनीस यांनी साकारलेल्या तुकारामांचा एवढा प्रभाव पडला की, त्यांची प्रतिमा, चित्र म्हणजे संत तुकाराम रूढ झाले. आज जुन्या काळातील तुकारामांच्या अनेक फोटोत पागनीस यांची प्रतिमा आहे. त्याचप्रमाणे भालचंद्र कुलकर्णी यांनी जोतिबाचा नवस चित्रपटात साकारलेली दख्खनचा राजा जोतिबा देवाची भूमिका आजही जोतिबा म्हणजे कुलकर्णींची प्रतिमा मानली जाते, अशी आठवण पंडीत कंदले यांनी सांगितली.

राजर्षी शाहू महाराजांवरील मालिकेतही भूमिका
लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती या दूरदर्शनवरील गाजलेल्या मालिकेत भालचंद्र कुलकर्णी यांनी रघुनाथ सबनीस (दिवाण) यांची भूमिका साकारली होती.

शिष्याच्या चित्रपटात शेवटची भूमिका
अभिनेते, निर्माते संजय तोडकर हे भालचंद्र कुलकर्णी यांचे शिष्य, त्यांच्या एका चित्रपटाचा गेल्या वर्षी गुढी पाडव्याला मुहूर्त झाला. या चित्रपटाचा नारळ कुलकर्णी यांनीच फोडला आणि या चित्रपटातील त्यांची भूमिका शेवटची भूमिका ठरली.

प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शोकसभा
अभिनेता, लेखक, भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले. त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सोमवार 20 मार्च रोजी दुपारी 4 वाजता प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शोकसभेचे नियोजन करण्यात आले आहे.

Related Stories

‘गोकुळ’ दुध उत्पादकांच्या मालकीचा करणार : मंत्री हसन मुश्रीफ

Archana Banage

चिन्मय मांडलेकर पुन्हा चढवणार जिरेटोप

Patil_p

कोल्हापूर : नगरसेवकाच्या त्रासामुळे जलअभियंता कुंभार यांनी सोडला पदभार!

Archana Banage

रत्नागिरीत झालेल्या 60 व्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत मुंबईचे ‘सुवर्णतुला’ प्रथम

Abhijeet Khandekar

मध्यप्रदेशात मंत्रिमंडळ विस्तार; पाच मंत्र्यांनी घेतली शपथ

prashant_c

जम्मू-काश्मीरमधील ‘दरबार मूव्ह’ प्रथा संपुष्टात

Patil_p