अनुराग ठाकूर यांची ट्विटरवरून माहिती
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अभिनेते आर माधवन हे ‘एफटीआयआय’चे नवे अध्यक्ष असतील. भारतीय चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करणारे प्रख्यात अभिनेते आर माधवन यांची भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून नामांकन करण्यात आले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
‘एफटीआयआय आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आर माधवन यांचे हार्दिक अभिनंदन. मला खात्री आहे की तुमचा अफाट अनुभव आणि भक्कम नीतिमत्ता या संस्थेला समृद्ध करेल, सकारात्मक बदल घडवून आणेल आणि उच्च स्तरावर नेईल. माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत.’ असे ट्विट अनुराग ठाकूर यांनी केले आहे.
अलीकडेच फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये उपस्थित असताना आर माधवनही चर्चेत आले होते. 14 जुलै 2023 रोजी बॅस्टिल डे सेलिब्र्रेशनचा एक भाग म्हणून लुव्रे म्युझियममध्ये झालेल्या कार्यकमाचे अनेक फोटो त्यांनी शेअर केले होते.
अलीकडेच, आर माधवन यांच्या ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेला एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट बनवणे हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले होते.