आयोजन समितीचे अध्यक्ष दशरथ परब यांनी जाहीर केला कार्यक्रम : अनेकांना मान्यवरांना निमंत्रण, गौरवग्रंथाचे होणार प्रकाशन
प्रतिनिधी /पणजी
गोव्याच्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱया माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत तथा भाई खलप यांच्या अमृतमहोत्सवपूर्तीनिमित्त भाईंच्या तमाम मित्र परिवारातर्फे उद्या शुक्रवार दि. 5 रोजी जाहीर सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष आणि ऍड. रमाकांत खलप अमृत महोत्सव गौरव समितीचे पदाधिकारी दशरथ परब यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक गुरूदास नाटेकर, चित्रा क्षीरसागर, अजित नार्वेकर, राजमोहन शेटय़े, प्रा. रवींद्र फोगेरी उपस्थित होते.
ऍड. रमाकात खलपांचे कार्य मोठे
हा सोहळा शुक्रवार दि. 5 रोजी सायं. 4 वा. इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात होणार आहे. या सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तरूण भारत समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकूर उपस्थित राहणार आहेत. ऍड. रमाकांत खलप यांचे कार्य फार मोठे आहे. मगो पक्षाकडून मांद्रे मतदारसंघात पाच वेळा खलप निवडून आले आहेत अशी माहिती दशरथ परब यांनी यावेळी दिली.
भाईंचा सर्वांना चांगला परिचय
भाईंचा सर्वांनाच चांगला परिचय आहे. मगो पक्षाकडून मांद्रे मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व त्यांनी केले आहे. त्यांच्या या सोहळय़ाला हितचिंतकांची उपस्थिती नक्कीच असेल अशी आशा उद्योजक गुरूदास नाटेकर यांनी यावेळी व्यक्त केली. अनेक मान्यवर, राजकारणी, समाजसेवक, उद्योजक, लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे.
गौरवग्रंथ प्रकाशित करणार गोव्याला जोडण्याचे कार्य ऍड. रमाकांत खलप यांनी केले आहे. पेडणे तालुक्याच्या विकासातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. या सोहळय़ात ऍड. रमाकांत खलप यांचा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात येणार असल्याचे राजमोहन शेटय़े यांनी सांगितले.