पायाभूत सुविधा, धातू क्षेत्रातला सर्वात मोठा व्यवहार ः 81 हजार कोटींना अधिग्रहण
वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने स्वीत्झर्लंडमधील सिमेंट उत्पादक कंपनी होलसिम यांचे अधिग्रहण करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. कंपनीने रविवारी अधिग्रहणाआधी बोली जिंकली आहे. साधारण 81 हजार 361 कोटी रुपयांना अधिग्रहणाचा व्यवहार होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पायाभूत सुविधा आणि धातूच्या क्षेत्रामध्ये झालेला हा व्यवहार सर्वात मोठा मानला जात आहे. या क्यवहारासाठी समूहाचे चेअरमन गौतम अदानी हे मागील आठवडय़ामध्ये अबुधाबी आणि लंडन येथे गेले होते. या दौऱयानंतर ते भारतात परतले आहेत. आता यापुढे होलसिमअंतर्गत येणाऱया एसीसी सिमेंट व अम्बुजा सिमेंटचा व्यवहार अदानी समूहाकडे राहणार आहे.
एसीसी, अम्बुजाची सुरूवात
एसीसीची सुरुवात 1 ऑगस्ट 1936 मध्ये मुंबईत झाली होती. इतर समूहाशी हातमिळवणी करून ही कंपनी सुरू झाली होती. तर 1983 मध्ये नरोत्तम सेखसरिया आणि सुरेश नियोतिया यांनी अम्बुजा सिमेंटची स्थापना केली होती.
होलसिम कंपनीने भारतामध्ये जवळपास 17 वर्षे आपला व्यवसाय केला आहे. जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी म्हणून सदरची कंपनी ओळखली जाते. या अधिग्रहणानंतर देशातील अल्ट्राटेक आणि जेएसडब्ल्यू यासारख्या सिमेंट उद्योगातील कंपन्यांना अदानी समूह मागे टाकू शकते, असेही सांगितले जाते.
गाशा गुंडाळणार होलसिम
या अधिग्रहणानंतर होलसिम कंपनी आपला भारतातील गाशा गुंडाळणार, हे स्पष्ट आहे. होलसिम समूहाचा अम्बुजा सिमेंट व एसीसी लिमिटेड यामध्ये वाटा आहे. अम्बुजा सिमेंटमध्ये 63 टक्के तर एसीसीमध्ये 54 टक्के हिस्सेदारी कंपनीची आहे.