वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱया गौतम अदानी यांनी आता आरोग्य क्षेत्रामध्ये उतरण्याचे निश्चित केले आहे. या अगोदर या कंपनीने सिमेंट क्षेत्रामध्येही पदार्पण केले होते. अदानी हेल्थ वेंचर्स लिमिटेड असे आरोग्य क्षेत्रातील नव्या कंपनीचे नाव असणार असल्याची माहिती समूहाकडून देण्यात आली आहे.
सदरच्या नव्या कंपनीमार्फत उपचारासंबंधित सेवासुविधा मिळण्यासोबत आरोग्य तंत्रज्ञानाशी संबंधित सुविधा मिळू शकणार आहेत. त्यासोबत संशोधन केंद्रांचीही स्थापना केली जाणार आहे. समूह या आरोग्य क्षेत्रामध्ये नव्याने 31 हजार कोटी रुपये गुंतवणूक करू शकते. वैद्यकीय आणि डायग्नोस्टिक सेवाही ही नवी कंपनी देणार आहे. या अंतर्गत विविध चाचण्यांचीही सोय करण्यात येणार आहे.
सिमेंट उद्योगातही उडी
कंपनीने या अगोदर सिमेंट क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलेले आहे. त्यांनी अलीकडेच अम्बुजा सिमेंट्स व एसीसी सिमेंट्सचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांचे संचालन पाहणाऱया होलसिम या कंपनीचे अधिग्रहण केल्याने आता सिमेंट क्षेत्रातही अदानी समूहाचा दबदबा वाढणार आहे.