प्रतिनिधी /बेळगाव
क्रीडा शिक्षक हे विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिकरित्या सक्षम बनविण्याचे कार्य करत असतात, असे मत शहर क्रीडा शिक्षणाधिकारी जाहिदा पटेल यांनी व्यक्त केले. जायंट्स सखीच्या आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर अध्यक्षा चंद्रा चोपडे, माजी अध्यक्षा नीता पाटील, उपाध्यक्षा विद्या सरनोबत आणि सचिव सुलक्षणा शिनोळकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलित करून जायंट्सच्या प्रार्थनेने झाली. स्वागत आणि प्रास्ताविक उपाध्यक्षा अपर्णा पाटील यांनी केले.
यावषी बेळगाव शहरातील महिला क्रीडा शिक्षिका जिजामाता हायस्कूलच्या गीतांजली मंडोळकर, मराठी विज्ञानिकेतनच्या पूजा संताजी, डीपी स्कूलच्या सिल्व्हिया डीलिमा, सरस्वती गर्ल्स हायस्कूलच्या साधना भद्री आणि महिला विद्यालयाच्या विजयमाला पाटील यांना सखी आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यांचा गौरव प्रमुख पाहुण्या शहर क्रीडा शिक्षणाधिकारी जाहिदा पटेल, अध्यक्षा चंद्रा चोपडे, माजी अध्यक्षा नीता पाटील, उपाध्यक्षा विद्या सरनोबत, सचिव सुलक्षणा शिनोळकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय शीतल नेसरीकर यांनी तर आदर्श शिक्षिकांचा परिचय शीतल पाटील यांनी करून दिला.
आपल्याला मिळालेल्या पुरस्काराप्रती सर्वच शिक्षिकांनी कृतज्ञता व्यक्त केली. चंद्रा चोपडे यांनी शिक्षक दिनाबद्दल माहिती दिली व गौरवमूर्ती शिक्षिकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी फेडरेशन संचालिका नम्रता महागावकर यांच्यासह सर्व सदस्या उपस्थित होत्या. सूत्रसंचालन ज्योती अनगोळकर यांनी केले तर आभार सुलक्षणा शिनोळकर यांनी मानले.