प्रतिनिधी/ येळ्ळूर
येळ्ळूर येथील महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. पी. कानशिडे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल त्यांचे येळ्ळूरसह जिल्हय़ातून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांना जिल्हास्तरीय झालेल्या कार्यक्रमामध्ये हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
मुख्याध्यापक कानशिडे यांनी 1990 पासून शिक्षक म्हणून सेवा बजाविण्यास सुरुवात केली. त्यांनी 12 वर्षे साहाय्यक शिक्षक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर 21 वर्षे मुख्याध्यापक म्हणून ते महाराष्ट्र हायस्कूलमध्ये सेवा बजावत आहेत. यापूर्वीही त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
कानशिडे यांनी बेळगाव तालुका समाज विज्ञान विषय फोरमचे अध्यक्ष व सेपेटरीचे पदही भूषविले आहे. विद्यार्थ्यांना टीव्हीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र हायस्कूलचा गेली पंधरा वर्षे दहावीचा निकाल 100 टक्के लावण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. एसएसएलसी बोर्डाकडून 1 लाख, 25 हजार रुपयांची तसेच अनेक वेळा त्यांना व महाराष्ट्र हायस्कूलला पारितोषिके मिळविली आहेत. बी. पी. कानशिडे यांचे वडील शिक्षक होते. त्यांनीच मार्गदर्शन करून शिक्षक बनण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. येळ्ळूरमधील कानशिडे कुटुंबाने शिक्षण क्षेत्रात एक वेगळा ठसा निर्माण केला आहे.