2 वर्षीय मुलीला वाचविण्यासाठी आईचा अनोखा उपाय ः फ्रान्समध्ये पोहोचल्याने दोघी सुरक्षित
युक्रेनमधील साशा माकोवी यांना रशियाच्या बॉम्बवर्षावाची भीती सतावू लागल्याने त्यांनी स्वतःच्या 2 वर्षीय मुलीच्या पाठीवर पूर्ण पत्ता तसेच संपर्काचा तपशीलच लिहिला. कीव्हमध्ये विमानातून प्रवास करण्यापूर्वी माकोवी यांनी स्वतःची मुलगी वीराच्या पाठीवर तिचे नाव, जन्मतारीख आणि कुटुंबाचा संपर्क क्रमांक लिहिला होता.
हृदयद्रावक असलेले मुलीचे हे छायाचित्र व्हायरल झाले असून युक्रेनच्या सर्वसामान्य कुटुंबांसमोरील अडचणी आणि भीतीचे दृश्य जगासमोर उभे राहिले आहे. परंतु माकोवी आता वीरासोबत दक्षिण फ्रान्समध्ये सुरक्षित पोहोचल्या आहेत. तेथील लेपिनन गावात एका प्रेंच कुटुंबाने त्यांना राहण्यासाठी जागा दिली आहे. मी अत्यंत घाबरले होते, वीराला स्वतःच्या कुटुंबाबद्दल विसर पडू नये म्हणून चिंतेत होते असे माकोवी यांनी स्वतःच्या भीतीबद्दल बोलताना सांगितले आहे.
आमच्या कुटुंबात अनेक वर्षांनी अपत्याच्या स्वरुपात वीराने जन्म घेतला होता. कुटुंबात लाडाने तिला मोठे होताना पाहण्याची आमची इच्छा होती. परंतु सीमा ओलांडताना रशियाचे सैनिक वीराला हिसकावून घेण्याची भीती वाटत होती असे त्यांनी सांगितले आहे. माकोवी या युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये गॅलरी असिस्टंट म्हणून काम करत होत्या.
वीराच्या पाठीवर लिहिताना मी घाईगडबडीत मोबाइल क्रमांकाचा एक अंक चुकीचा लिहिला होता असे त्यांनी म्हटले आहे. माकोवी यांच्या 57 वर्षीय आई अन्ना लिमेंको या कीव्हमध्येच थांबण्यासाठी आग्रही होत्या. परंतु त्यांच्या निकटवर्तीयांनी कीव्ह सोडण्यासाठी त्यांना तयार केले. लिमेंको प्रथम पोलंड येथे पोहोचल्या आणि मग एक आठवडय़ानंतर दक्षिण फ्रान्समध्ये स्वतःच्या मुलीजवळ पोहोचल्या. सोशल मीडियावर हितचिंतकांचे प्रमाण वाढल्याने माकोवी यांनी स्वतःच्या नव्या मुलीचे छायाचित्र अपलोड केले आहे.