‘माझी जीभ घसरली, चुकून बोललो, माफी स्वीकारा!’
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘राष्ट्रपत्नी’च्या वक्तव्याबद्दल काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवून माफी मागितली. ‘मी अनावधानाने तुमच्यासाठी चुकीचा शब्द वापरला. माझी जीभ घसरली. मी माफी मागतो आणि तुम्हाला ती स्विकारण्याची विनंती करतो,’ अशा आशयाचे लेखी पत्र त्यांनी राष्ट्रपतींना लिहिले आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रपतींकडे भेटण्याची वेळ मागितली असली तरी द्वयींची अद्याप प्रत्यक्ष भेट झालेली नाही. चौधरी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपतींकडे विनंती करत शनिवारी भेटीची वेळ मागितली आहे.
बुधवारी दिल्लीच्या विजय चौकात झालेल्या आंदोलनादरम्यान पत्रकारांशी बोलताना अधीर रंजन यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्यासाठी ‘राष्ट्रपत्नी’ असा शब्द वापरला होता. सत्ताधारी भाजप खासदारांनी याला कडाडून विरोध केला, तसेच अधीर आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. चौधरी यांनी राष्ट्रपतींना ‘राष्ट्रपत्नी’ असे संबोधल्यानंतर गुरुवारी मोठा राजकीय वाद सुरू झाला. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाजही विस्कळीत झाले. काँग्रेसला ‘आदिवासीविरोधी, महिलाविरोधी आणि गरीबविरोधी’ म्हणत भाजपने विरोधी पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी माफी मागावी, असे म्हटले होते. याचदरम्यान काँग्रेसचे भाजपवर आरोप करत लोकसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी सभागृहामध्ये सोनिया गांधी यांचा अपमान केल्याचा दावा केला होता.
अधीर रंजन यांच्यावर गुन्हा दाखल
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात मध्यप्रदेशातील दिंडोरी येथे आयपीसीच्या कलम 153(बी) आणि 505(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरीचे एएसपी जगन्नाथ मार्कन यांनी गुन्हा नोंद झाल्याची माहिती दिली. तसेच राष्ट्रीय महिला आयोगानेही चौधरी यांना नोटीस बजावली असून 3 ऑगस्टपर्यंत आपली बाजू आयोगासमोर स्पष्ट करण्याची सूचना केली आहे.