ऑनलाईन टीम / मुंबई :
युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ((Environment Minister Aditya Thackeray) येत्या 10 जून रोजी अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहेत. आदित्य ठाकरेंसोबत यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक देखील असतील. या दौऱ्याची तयारीही पूर्ण झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याआधी अयोध्येत शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीतून शिवसेनेने मनसेला डिवचलं आहे. राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्येला जाणार आहेत. त्यामुळे अयोध्या दौऱ्यावरून शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना-मनसे वाद आता अयोध्येतही पोहचला आहे. शिवसेनेने अयोध्येत पोस्टरबाजी करत राज ठाकरेंना डिवचलं आहे. “असली आ रहा है, नकली से सावधान”, असं लिहिलेली पोस्टर्स शिवसेनेकडून अयोध्येत ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचेही फोटो आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना या पोस्टर्समधून टोला लगावला आहे.