@वृत्तसंस्था / पाटणा
2024 मध्ये होणाऱया लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांची एक आघाडी निर्माण करत भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या गतिमान झाले आहेत. याचदरम्यान महाराष्ट्रातील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बुधवारी बिहारची राजधानी पाटण्याचा दौरा केला आहे. या दौऱयात आदित्य यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत असलेली आघाडी तोडली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडी स्थापन करत राज्यात सरकार स्थापन केले होते. परंतु हे सरकार एकनाथ शिंदे यांच्यासोबत 50 हून अधिक आमदारांनी वेगळा गट स्थापन केल्याने कोसळल्यानंतर शिंदे यांनी भाजपच्या साथीने सरकार स्थापन केले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गट विविध राजकीय पक्षांचा भाजपविरोधात पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.
आदित्य ठाकरे यांच्यासोबत खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई हे देखील पाटण्याच्या दौऱयावर होते. त्यांनी बुधवारी तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी जात चर्चा केली आहे. तेजस्वींनी यावेळी आदित्य ठाकरे यांना राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या जीवनावर आधारित पुस्तके भेटवस्तू म्हणून दिली आहेत. त्यानंतर आदित्य यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली असू यावेळी तेजस्वी यादव देखील उपस्थित होते.
नितीश कुमार यांनीही भाजपसोबतची आघाडी संपुष्टात आणत बिहारमध्ये महाआघाडीचे नवे सरकार स्थापन केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी नितीश कुमार हे विशेष सक्रीय आहेत. विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.