वृत्तसंस्था/ मुंबई
अर्जुन तेंडुलकर व सिद्धेश लाड यांच्यानंतर मुंबई संघातील आणखी एक खेळाडू आदित्य तरेने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय घेतला असून तो आता उत्तराखंड संघातून खेळणार आहे.
या 34 वर्षीय अनुभवी यष्टिरक्षक फलंदाजाच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2015-16 या मोसमात शेवटचे रणजी करंडक जेतेपद पटकावले होते. येत्या मोसमात तो व्यावसायिक खेळाडू म्हणून उत्तराखंड संघातून खेळणार आहे. मुंबई निवड समितीने बीकेसी येथे मोसमपूर्व फिटनेस शिबिर आयोजित केले असून यासाठी 47 खेळाडूंची निवड केली आहे. त्यात आदित्य तरेचा समावेश करण्यात आलेला नाही. गेल्या मोसमातही त्याला विजय हजारे करंडक स्पर्धेतून वगळण्यात आले, त्यावेळी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये यापुढे त्याला संधी मिळणार नसल्याचे त्याला निवड समितीने सांगितले होते. या सर्व घडामोडीमुळे दुखावलेल्या आदित्यने अन्य संघातून खेळण्यासाठी मुंबईकडे ना-हरकत सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता.
2014-15 मोसमात त्याने मुंबईचे पहिल्यांदा नेतृत्व केले आणि त्यावेळी मुंबईने उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर 2016-17 मोसमात त्याने मुंबईला अंतिम फेरी गाठून दिली होती.