बारमालकांना 22 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याची सूचना
प्रतिनिधी /पणजी
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या आसगांव येथील तथाकथित सिली सोल्स कॅफे-बार प्रकरणाची अबकारी आयुक्तांसमोरील सुनावणी तहकूब झाली असून ती आता 22 ऑगस्ट रोजी होणार आहे. तक्रारदार आयरीश रॉड्रिग्स यांनी या बारला परवाना नसल्याचा दावा करुन अबकारी आयुक्तांसमोर याचिका सादर केली होती. त्यावर काल प्राथमिक सुनावणी होऊन बालमालकांनी 22 ऑगस्टपर्यंत उत्तर द्यावे, असे बजावण्यात आले आहे.
अबकारी आयुक्त नारायण गाड यांच्यासमोर रॉड्रिग्स यांनी जोरदार युक्तिवाद केला. बारला परवाना नसताना मद्य विक्रीसाठी कसा काय परवाना देण्यात आला? याची विचारणा केली. बार मालकातर्फे बेनी नाझारेथ यांनी बाजू मांडली. बार स्व. अँथनी गामा यांच्या नावावर असून त्यांचे पुत्र डिन सुनावणीवेळी हजर होते. स्व. गामा यांचे आधारकार्ड मुंबईचे असून ते तेथील रहिवासी असल्याचा दावा रॉड्रिग्स यांनी केला. खोटी, अपुरी कागदपत्रे दाखवून बारला परवाना घेतला काय? आणि अबकारी खात्यातर्फे परवाना देताना त्रुटी राहिली काय? या दोन मुद्यांवर बारमालकांनी उत्तर देण्याची सूचना करण्यात आली आहे.