Tarun Bharat

‘कोरोना’साठी प्रशासन सज्ज

बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : दि. 27 रोजी तीन्ही प्रमुख इस्पितळात ‘मॉक ड्रिल’,मास्कची सक्ती नाही, 3 जानेवारीनंतर पुन्हा आढावा बैठक

प्रतिनिधी /पणजी

कोरोनासंदर्भात सध्या तरी गोव्यात ‘भिवपाची गरज ना’ असे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले असून सणासुदीचा हंगाम तसेच नवीन वर्ष प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची कोणतीही बंधने घातली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना व्यवस्थापनाच्या तयारीचा परामर्श घेण्यासाठी 27 डिसेंबर रोजी गोमेकॉत तसेच उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ‘मॉक ड्रिल’ करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नवीन वर्षात 3 जानेवारीनंतर कोरोनाचा आढावा घेऊन पुढील कृती ठरवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

डॉ. सावंत यांनी राज्यातील कोरोनाच्या एकंदरित तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती. त्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. सावंत यांनी वरील माहिती दिली.

उत्सव असल्याने बंधने नकोत

सध्या गोव्यात नाताळ, नवीन वर्ष तसेच इतर उत्सवाचा हंगाम सुरु असल्याने कोरोनाची कोणतीही बंधने लागू करण्याची आपली इच्छा नाही. कोरोनाला तोंड देण्यासाठी आणि सामोरे जाण्याकरीता सरकारची पूर्ण सज्जता असून आवश्यक ती साधन-सुविधा उपलब्ध आहे. तेव्हा घाबरण्याचे कारण नाही, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.

मास्क घालणे ऐच्छिक

मास्कची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. मास्क घालणे ऐच्छिक असून ज्यांना गरज किंवा इच्छा आहे त्यांनी ते घालावेत. गोव्यात सध्या पर्यटनाचा हंगाम असून बंधने घालून पर्यटकांचा हिरमोड करण्याची इच्छा नाही. बंधने घालण्यासारखी परिस्थिती अद्याप गोव्यात नाही. येत्या 3 जानेवारीपर्यंत कोणतीही बंधने नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर देशासह गोव्यातील कोरोनाची स्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

इस्पितळांमध्ये 27 रोजी ‘मॉक ड्रिल’

कोरोनाबाबतची केंद्र सरकारची सर्व मार्गदर्शक तत्वे गोव्यात पाळण्यात येतील. कोरोनाला तोंड देण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तीन प्रमुख सरकारी इस्पितळांत ‘मॉक ड्रिल’ होणार आहे. मंगळवार 27 डिसेंबरला ते केले जाणार आहे. ऑक्सिजन, पीपीई किट, व्हेंटीलेटर याची तयारी आहे, असेही डॉ. सावंत म्हणाले. बैठकीला आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मुख्य सचिव परिमल राय, दोन्ही जिल्हाधिकारी व इतर उपस्थित होते.

बुस्टर डोसची केंद्राकडे मागणी

केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवीय यांच्याशी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली आणि त्यांना गोव्यातील कोरोना व्यवस्थापनाच्या तयारीची माहिती दिली. गोमंतकीय जनतेसाठी कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस पाठवण्यात यावेत, तसेच कोव्हिशील्ड आणि नाकातून देण्यात येणारी अशा दोन्ही लसींचा पुरेसा पुरवठा गोव्यासाठी करावा, अशी मागणी व विनंती राणे यांनी त्यांच्याकडे केली. विमानतळावर प्रवाशांची अधून-मधून तपासणी करण्यात येणार असल्याचे राणे यांनी त्यांना सांगितले. गोव्यातील मुख्य सरकारी इस्पितळे कोरोनासाठी सुसज्ज करण्यात आल्याचेही राणे यांनी नमूद केले.

Related Stories

शेळ-मेळावली भागातील नागरिकांची जंगलसप्पती वाचविण्यासाठी धडपड सुरूच

Amit Kulkarni

बाणावली धिरयोत बैल जखमी

Omkar B

सरासरी 80 टक्के उत्साही मतदान

Amit Kulkarni

अट्टल चोरटय़ाला पणजी पोलिसांनी केली अटक

Patil_p

पाव, उंडे 2 ऑक्टोबरपासून महागणार

Amit Kulkarni

नव्या मोटरवाहन कायद्याची अंमलबजावणी 7 पासून

Omkar B
error: Content is protected !!