विधानपरिषद सभापती रामराजेंच्या सूचना पूरस्थितीचा आढावा बैठक
प्रतिनिधी/ फलटण
सध्या तालुक्यात रोज पाऊस पडत असल्याने शहर व तालुक्यातील नदी नाले ओढय़ांना पूर येत आहे. पुरामुळे गावांचा संपर्क तुटत आहे. पावसामुळे निर्माण होणाऱया परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहवे आवश्यक त्याठिकाणी उपाययोजना कराव्यात अशा सूचना महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी केल्या आहेत.
शहर व तालुक्यात पडलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत रामराजे बोलत होते.
याप्रसंगी आ. दिपक चव्हाण, प्रांतधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसिलदार समिर यादव, गटविकास अधिकारी समीर यादव, तालुका कृषी अधिकारी सागर डांगे, नगरपालिका मुख्याधिकारी संजय गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता खोसे आदी उपस्थित होते.
आगामी काही दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे पुढील पूरस्थितीचा विचार करून प्रशासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे स्थानिक अहवाल संबधित गावचे तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कृषी सहायक यांच्याकडुन तातडीने तयार करून घ्यावेत. सर्व अधिकाऱयांना नियुक्तीच्या ठिकाणी राहण्याचे आदेश देण्यात यावेत असे सांगत बाणगंगा धरण फलटण शहरातुन वहात असल्याने त्याचे पडसाद शहरात उमटतात. यासाठी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱयांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी. पडणाऱया पावसामुळे धरणातील पाणी पातळीवर लक्ष द्यावे. जुने धरण असल्याने योग्य ते लक्ष या धरणावर संबधित यंत्रणेनी दिले पाहिजे अशा विविध सूचना उपस्थित प्रशासनातील अधिकाऱयांना यावेळी रामराजे यांनी दिल्या.
फलटण तालुक्यात रोज संध्याकाळीच पाऊस पडत आहे. त्यामुळे पिकांचे, शेतीचे अथवा घराचे नुकसान होते आहे. शासनस्तरावरून शेतकऱयांना जास्त आर्थिक लाभ मिळावा यासाठी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱयांनी तातडीने पंचनामे करावेत. त्याचा अहवाल आपल्या वरिष्ठांकडे त्वरित पाठवावा अशा काही सूचना आ. दिपक चव्हाण यांनी यावेळी केल्या.