योजनेची अंमलबजावणी सुरू : ग्रामसभेत केला होता ठराव : कृत्रिम साधने व उपकरणे देण्याचा अभिनव उपक्रम
प्रतिनिधी /पणजी
बार्देश तालुक्मयातील सुकूर पंचायतने दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम साधने आणि उपकरणे खरेदीसाठी ‘दिव्यांगस्नेही’ योजना सुरू केली आहे. शुक्रवारी राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी सुकूरचे सरपंच संदीप मांजरेकर यांनी पावसकर यांनी सुचवलेल्या संकल्पना अंमलात आणल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाला सादर केलेल्या पत्रात, सुकूर पंचायतीने उल्लेख केला आहे की पंचायतीने दिव्यांग व्यक्तींकरिता कृत्रिम साधने आणि उपकरणे खरेदीसाठी ’दिव्यांगस्नेही’ ही योजना सुरू करणार असून यासाठी पंचायतीच्या 2022-2023 अंदाजपत्रकात 2,00,000/- रु. आर्थिक तरतूद केली आहे. ही योजना 27 फेब्रुवारी 2022 च्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आली होती.
राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी दिव्यांग व्यक्तींकरिता कृत्रिम साधने आणि उपकरणे खरेदीसाठी एक योजना पंचायतने आखावी, असे सूचवताच सरपंच संदीप मांजरेकर यांनी याची गांभीर्याने घेतली व प्रत्यक्षात अंमलात आणण्याची कार्यवाही सुरू केली.
या योजनेविषयी अधिक माहिती देताना आयुक्त पावसकर म्हणाले, दिव्यांगत्वाचे परिणाम कमी करून आर्थिक क्षमता वाढवणारी आवश्यक साधने आणि उपकरणे मिळविण्यात दिव्यागांना मदत करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016, द्वारे परिभाषित केल्यानुसार, कोणत्याही 21 प्रकारचे किमान 40 टक्के दिव्यांग असलेली व्यक्ती या योजनेसाठी पात्र असतील. राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर लवकरच या योजनेसाठी उर्वरित मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणार आहेत.
अशी योजना इतर पंचायतींनीही राबवावी!
पावसकर म्हणाले, पंचायती या गावातील समाजातील सर्व घटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी असतात. आम्हाला आनंद होत आहे की सूकूर पंचायतीने दिव्यांग व्यक्तींच्या गरजा पूर्ण करणारी योजना सुरू केली आहे. राज्यातील इतर पंचायतींनीही अशी योजना दिव्यांग व्यक्तींसाठी राबवावी आणि या बदलाचा भाग व्हावा, असे आवाहन पावसकर यांनी केले.