वृत्तसंस्था/ कँडी
सलामीचा फलंदाज इब्राहिम झद्रनचे शानदार शतक तसेच फारुकीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणने यजमान लंकेचा 60 धावानी पराभव केला. इब्राहिम झद्रनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या मालिकेतील दुसरा सामना कँडीमध्ये रविवारी खेळविला जाणार आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणने 50 षटकात 8 बाद 294 धावा जमवल्या. इब्राहिम झद्रनने 11 चौकारासह 106, गुरबाजने 9 चौकारासह 53, रेहमत शहाने 2 चौकारासह 52, नजीबुल झद्रनने 1 षटकार आणि 5 चौकारासह 42, नईबने 1 षटकार आणि 2 चौकारासह 22 धावा जमवल्या. अफगाणच्या डावात 2 षटकार आणि 29 चौकार नेंदवले गेले. लंकेतर्फे हसरंगाने 2 तर रजिता, धनंजय, कुमारा आणि तिक्षणा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेचा डाव 38 षटकात 234 धावात आटोपला. सलामीच्या निशांकाने एकाकी लढत देत 10 चौकारासह 85, हसरंगाने 46 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारासह 66, कर्णधार शनाकाने 2 चौकारासह 16 आणि असलंकाने 10 धावा जमवल्या. अफगाणतर्फे फारुकीने 49 धावात 4, अहमदझाईने 2, नईबने 34 धावात 3 आणि रशीद खानने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः अफगाण 50 षटकात 8 बाद 294 (इब्राहिम झद्रन 106, गुरबाज 53, शहा 52, एन. झद्रन 42, नईब 22, हसरंगा 2-42), लंका 38 षटकात सर्वबाद 234 (निशांका 85, हसरंगा 66, फारुकी 4-49, नईब 3-34, अहमदजाई 2-46, रशीद खान 1-40).