भारतातील वातावरणात लवकरच रुळण्याचे संकेत
भोपाळ / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेल्या चित्त्यांची पहिली पहाट (सकाळी) रविवारी झाली. रविवारी सकाळी मोरांसह इतर वन्य प्राण्यांचे आवाज ऐकून चित्ते सावध झालेले दिसले. यादरम्यान मोराच्या आवाजासोबत चित्त्यांची डरकाळीही ऐकू येत होती. एका चित्त्याचा पाणी पितानाचा व्हिडीओ समोर आला असून एका चित्त्याची मौज-मस्ती करतानाची छायाचित्रे व्हायरल होत आहेत.
70 वर्षांनंतर चित्ते भारतात परतले आहेत. कुनोच्या जंगलात चित्त्यांचा आवाज पूर्णपणे नवीन होता. कुनो येथील सुरक्षा व्यवस्थेत गुंतलेल्या तज्ञांनी चित्त्यांवर नजर ठेवत त्यांच्या विविध हालचाली कॅमेऱयात टिपल्या. यातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कुनो राष्ट्रीय उद्यानात आठ आफ्रिकन चित्ते आणण्यात आले आहेत. कुनोमध्ये सोडल्यानंतर चित्त्यांनी परिसराची बारकाईने पाहणी केली आणि सायंकाळी उशिरा विश्रांती घेतल्यानंतर पाणी सेवन केले. चित्त्यां विशेष संरक्षणात गुंतलेल्या तज्ञांनी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले आणि त्यांना मांस दिले. त्याचे सेवनही चित्त्यांनी केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर आलिंगन देतानाची कृती कॅमेऱयात कैद झाली असून, त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचवेळी 3 क्रमांकाच्या गेटजवळ आणखी एक चित्ता पाणी पिताना दिसला.
चित्त्यांचा नामकरण सोहळा लवकरच
कुनो नॅशनल पार्कमध्ये आठ आफ्रिकन चित्त्यांचा नवीन अधिवास सापडला आहे. चित्ते आणल्यानंतर आता त्यांची नावे ठेवण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. लवकरच 5 मादी आणि 3 नर चित्त्यांना नावे दिली जातील. यानंतर कुनो येथील चित्त्यांच्या कुळांना विशेष नावाने संबोधले जाईल आणि भारतातील चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू होतील, असे डीएफओ प्रकाश कुमार वर्मा यांनी सांगितली. सध्या सोशल मीडियावर चित्त्यांच्या नावांबाबत नावे सुचवली जात आहेत.