विमान प्रवासात अनेकदा अनोखे अनुभव येतात. प्रवाशांच्या सोयीसाठी विमानतळावर शक्य तितकी उपाययोजना केलेली असते. पण अनेकदा चेक इन साठी दिले गेलेले सामान पुन्हा परत मिळवताना अडचणी येतात. काही वेळेला प्रवाशांची बॅग बेपत्ता होते आणि ती भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचते.
अमेरिकेच्या ओरेगॉनमध्ये राहणाऱया एप्रिल गेविन नामक महिलेची बॅग विमानतळावरून अशीच हरवली होती. ती शोधण्याचा शक्य तितका प्रयत्न तिने केला. विमानतळ व्यवस्थापनाने त्याच्यापरीने जितके करता येणे शक्य होते तितके केले. तथापि, बॅग काही मिळाली नाही. अखेरीस या महिलेने बॅगचा नाद सोडून दिला आणि कालांतराने ती हा प्रकार विसरूनही गेली. तिला विमान कंपनीच्या व्यवस्थापनाने आपल्या चुकीबद्दल नुकसानभरपाईही दिली.
तथापि, तब्बल चार वर्षांनंतर तिची बॅग सापडल्याचे तिला सांगण्यात आले. तिने लगबगीने विमानतळावर जाऊन खात्री करून घेतली. बॅग तिचीच होती. इतकेच नव्हे तर ती जशा स्थितीत हरवली होती, तशाच स्थितीत सापडली. बॅगेमधील कुठलीही वस्तू गायब झालेली नव्हती. याचे तिला अत्यंत आश्चर्य वाटले. सूटकेस परत मिळेल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. तिच्या या बॅगेने चार वर्षात तीन देशांचा प्रवास केला होता. अखेरीस होंडुरास या देशात या बॅगचा प्रवास संपला आणि ती बॅग ज्या विमानतळावर हरवली होती, तेथे परत पाठवण्यात आली. महिलेने युनायटेड एअरलाईन्स या विमान कंपनीला मनःपूर्वक धन्यवाद दिले.