सांबरा/वार्ताहर : गेल्या महिन्याभरापासून मोदगा बाळेकुंद्री परिसरात तळ ठोकून असलेल्या तरसने सोमवारी पंत बाळेकुंद्री येथे भर लोक वस्तीमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्याला शेतवाडीत उसकावून लावण्यात यश मिळवले आहे..येथील स्थानिक नागरिकांच्या मोबाईल मध्ये तरसची छबी कैद झाली असून त्यामुळे या भागांमध्ये तरसचा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. पंत बाळेकुंद्री येथील आनंदनगर परिसरामध्ये सोमवारी सकाळी काही जणांना तरस या प्राण्याचे दर्शन झाले .त्यावेळी तेथील काही स्थानिक नागरिकांनी संभाव्य धोका ओळखून तरसला गावच्या उत्तर भागाकडील शेतवडीमध्ये हूसकावून लावण्यात यश मिळवले .
गेल्या महिन्याभरापूर्वी सर्वप्रथम मोदगा येथे तरस या प्राण्याचे नागरिकांना दर्शन झाले होते .त्यानंतर बाळेकुंद्री खुर्द येथील शिवारामध्ये शेतकऱ्यांना तरस दिसला होता त्या पाठोपाठ बसवण कुडची येथे गवत आणण्यासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांना तरस दिसला होता त्यामुळे या भागांमध्ये तरस या प्राण्याचा वावर वाढण्ल्याचे दिसून येत आहे.
तरस हा प्राणी मांसाहारी प्राणी असून साधारण तो कुत्र्याप्रमाणे दिसतो. तो दिसायला भयानक असतो तर हा मेलेल्या प्राण्यांचे मांस खाऊन जगतो तर ते दुसऱ्याने केलेले शिकार पळवण्यासाठी ही तरबेज असतात .तरस हे समूहामध्ये असतील तर माणसावर देखील हल्लाही करू शकतात . या भागात तरसची संख्या नेमकी किती आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी तरसचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तरसला लोकवस्तीतून हुसकावून लावताना चा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मंगळवारी दिवसभर पूर्व भागात या व्हिडिओचीच चर्चा सुरू होती.