169 पैकी 21 टिपरमध्ये बिघाड झाल्याने बंद: नवीन घेतलेल्या सीएनजीवरील 7 टिपरचा समावेश: 15 दिवसांपासून टिपर वर्कशॉपमध्ये धुळखात: कचरा उठावाच्या यंत्रणेवर परिणाम
कोल्हापूर/ विनोद सावंत
महापालिकेकडून टिपरच्या माध्यमातून ‘घर टू घर’ जाऊन कचरा उठाव केला जातो. स्वच्छ भारत अभियानातून यासाठी 169 टिपर मिळाले आहेत. प्रमाणापेक्षा जास्त कचरा उठाव केल्याने तसेच वेळच्यावेळी मेंटनन्स होत नसल्याने केएमटी पाठोपाठ आता टिपरचाही अक्षरश: खुळखुळा झाला आहे. तब्बल 21 टिपरमध्ये बिघाड झाला असून 15 दिवसांपासून वर्कशॉपमध्ये धुळखात पडून आहेत. यामुळे शहरातील कचरा उठावावरही परिणाम होत आहे.
कोल्हापूर महापालिकेने शहर कोंडाळेमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. तब्बल 1050 केंडाळे हटविले आहेत. केवळ 10 ते 15 कोंडाळे शिल्लक आहेत. कोंडाळे काढल्याने शहरातील कचरा उठाव टिपरच्या माध्यमातून ‘घर टू घर’ जाऊन केला जात आहे. दोन सत्रामध्ये कचरा उठावाचे काम सुरू आहे. राज्यशासनाने यासाठी महापालिकेला स्वच्छ भारत अभियानातून पहिल्या टप्प्यात 104 आणि दुसऱ्या टप्प्यात 65 टिपर दिले आहेत. 104 टिपर डिझेलवरील असून 65 टिपर सीएनजीवरील आहेत. मनपाने दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्याने टिपरमध्ये बिघाडाचे प्रमाणे वाढले आहे. मध्यंतरी वार्षिक मेंटनन्सची जबाबदारी असणाऱ्या कंपनीचे बील दिले नसल्याने त्यांनी दुरूस्ती थांबवली होती. या दरम्यान, टीपरचे मेंटनन्सला ब्रेक लागला होता. आता कंपनीने बील दिले असले तरी दुरूस्ती करून टिपर येण्यास विलंब होत आहे. सद्याच्या घडीला 169 पैकी तब्बल 21 टिपरमध्ये बिघाड झाला असल्याने बंद आहेत. यामध्ये 10 टिपर वकॅशॉपमध्ये धुळखात पडून आहेत. उर्वरीत टिपर दुरूस्तीसाठी कंपनीकडे दिली आहेत.
चालक, वाहक टिपरच्या प्रतिक्षेत
बिघाडमुळे 21 टिपर बंद झाल्याने रोज चार ते पाच चालक, कामगार टिपर नसल्याने वकॅशॉपमध्ये बसून असतात. दुपारी दुसरा टिपर ड्यूटी संपून वर्कशॉपमध्ये आल्यानंतर ते घेऊन जातात. यामुळे काही प्रभागातील कचरा उठावावर परिणाम होत आहे. अवेळी टिपर येत असल्याने कचरा रस्त्यावरच टाकला जात आहे.
महापालिककडे 169 टिपर असून यापैकी 17 टिपर स्पेअरल ठेवले आहेत. वापरातील टिपरपैकी 21 टिपर मेंटनन्समुळे बंद आहेत. असे असले तरी स्पेअरल असलेल्या टिपरचा वापर केला जात असून यामुळे टिपर खराबमुळे कचरा उठावावर फारसा परिणाम होत नाही.
राहूल राजगोळकर, विभागीय आरोग्य निरिक्षक, महापालिका
महापालिकेकडे एकूण टिपर -169
डिझेलवरील टिपर -104
सीएनजीवरील टिपर -65
मेंटनन्समुळे बंद असणारे टिपर-21
नवीन टिपर झाले खराब
महापालिकेच्या ताफ्यात 65 नवीन टिपर आले आहेत. हे सर्व टिपर सीएनजीवरील आहेत. वास्तविक हे टिपर नवीन असल्याने खराब होता कामा नये. मात्र, डिझेल टिपरबरोबर या टिपरमध्येही वारंवार बिघाड होऊन बंद पडत आहे. सद्यस्थिती सीएनजीवरील 7 टिपर बंद पडले आहेत.
रस्त्यावरील कचरा उठावही टिपरने
शहरातील बहुतांशी कोंडाळे हटविले आहेत. मात्र, नागरिक हटविलेल्या कोंडाळाच्या ठिकाणी रस्त्यावरच कचरा टाकत आहेत. हा कचरा वास्तविक आर.सी. गाड्याने उठाव करणे अपेक्षित आहे. परंतू आर.सी. गाड्याही कालबाह्या झाल्या आहेत. यामुळे महापालिकेने भाडेतत्वावर ट्रक्टर घेतले होते. त्यांचे टेंडर कालावधी संपला असून मुदतवाढ दिली नसल्याने रस्त्यावरील कचरा उठाव टिपरमधून करावा लागत आहे.
दोन मोठे टिपर वर्षभरापासून धुळखात
महापालिकेने हॉटेल, खानवळ, लॉजिंगमधील कचरा उठावासाठी दोन मोठे आयशर कंपनीचे टिपर खरेदी केले आहेत. खरेदी केलेल्या कंपनीकडे वर्षभरातील मेंटनन्सची जबाबदारी होती. मेंटनन्सची मुदत वाढीची फाईल रखडल्याने वर्षभरापासून टिपर वर्कशॉपमध्ये धुळखात पडून आहे.