कोरगाव, धारगळ ग्रामसभेत झाला निर्णय
प्रतिनिधी /पणजी
महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्हय़ातील हेरवाड या ग्राम पंचायतीने विधवा प्रथेच्या विरोधात ‘विधवा सन्मान’ ठराव संमत करुन देशभरात सर्वप्रथम हा नवा प्रागतिक पायंडा पाडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आता त्यानंतर गोव्यातील दोन पंचायतींनीही असाच ठराव संमत करुन प्रागतिक पाऊल टाकले आहे. दोन्ही ग्रामपंचायती पेडणे तालुक्यातील असून धारगळ व कोरगाव पंचायतींनी हा निर्णय काल रविवारी झालेल्या ग्रामसभांमध्ये घेऊन संपूर्ण गोव्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
विधवा महिलांची या पुढे हेळसांड होणार नाही. त्यांना समाजात आदरपूर्वक वागवले जाईल. पतीच्या निधनावेळी त्यांचे कुंकू पुसले जाणार नाही, त्यांचे मंगळसूत्र काढले जाणार नाही, हातातील बांगडय़ा फोडल्या जाणार नाहीत, पायातील वेडे काढले जाणार नाही व त्यांना कधीच अशुभ मानले जाणार नाही. शुभ कार्यालासुद्धा त्यांना इतर स्त्रियांप्रमाणेच आग्रहाचे आमंत्रण असेल असे धारगळच्या ठरावात नमूद करण्यात आले आहे. दोन्ही ग्रामसभांमध्ये या विषयालाही इतर विषयांएवढेच महत्व देऊन त्यावर सांगोपांग चर्चा करुन ठराव एकमताने मंजूर करण्यात आले आहेत.