ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा खळबळजनक आरोप आ. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. तसेच साम, दाम, दंड असो की केंद्रीय यंत्रणांचा दबाव कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवयाची, हा लोकशाही कलुशित करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
रोहित पवार म्हणाले, ज्याप्रकारे शिवसेनेत फूट पाडली तशीच फूट पवार कुटुंबात पाडून राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा डाव आहे. शिवसेनेनंतर आम्हाला लक्ष्य केलं जाऊ शकतं. पण पवार कुटुंबात कोणतेही हेवेदावे नाहीत. सर्वांचे उद्दिष्ट स्पष्ट आहे. त्यामुळे पवार कुटुंबात फूट पडणार नाही. आपण स्वत: पवार घराण्याचे सदस्य असलो तरी राजकारणातील घराणेशाहीचं समर्थन करत नाही, राजकारणात कायमस्वरुपी टिकून रहायचं असले तर प्रयत्न आणि कष्ट घ्यावे लागतात. काम करुन दाखव आणि जगाला दाखवून दे असं आपले आजोबा शरद पवार सांगतात.
अधिक वाचा : रॉजर बिन्नी BCCI चे नवे अध्यक्ष
सुप्रिया सुळेंना लोकसभेत, अजित पवारांना राज्यात आणि मला सध्या जे करत आहे तेच काम करण्याची इच्छा आहे. पण पवार कुटुंबात अंतर्गत भांडण लावल्यावर राष्ट्रवादी फुटेल असं विरोधकांना वाटतंय. त्यामुळे शिवसेनेनंतर आम्ही पुढील टार्गेट असू शकतो. अजित पवारांसोबतच्या नात्यात असलेल्या दुराव्याबद्दल बोलताना ते म्हणाले, अजित पवारांनीच मला जिल्हा परिषद आणि आमदारकीचं तिकीट दिलं. माझं लग्नही त्यांनीच ठरवलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला मोठं व्हायचं असतं, तेव्हा आपल्या लोकांसोबत स्पर्धा करायची नसते. आम्ही कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही.