पहिल्यावहिल्या हंगामाची स्वप्नवत सांगता केल्यानंतर गुजरातवर कौतुकाचा वर्षाव
अहमदाबाद-गुजरात / वृत्तसंस्था
यंदाचे आयपीएल टायटल जिंकल्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार व अव्वल दर्जाचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने भारतीय संघातर्फे वर्ल्डकप जिंकणे, हे आपले पुढील लक्ष्य असेल, असे आवर्जून नमूद केले. गुजरात टायटन्सला पहिल्याच हंगामात स्वप्नवत जेतेपद संपादन करुन दिल्यानंतर तो माध्यमांशी बोलत होता. येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी झालेल्या लढतीत गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून पराभूत करत झळाळत्या आयपीएल चषकावर आपले नाव कोरले.
‘वर्ल्डकप जिंकण्यासाठी हरसंभव योगदान देणे हा माझा सर्वोच्च प्राधान्यक्रम असेल. भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणे ही माझ्यासाठी स्वप्नपूर्ती असते आणि अशा परिस्थितीत किती सामने खेळलो, हे गौण स्वरुपाचे असते. लाँग टर्म आणि शॉर्ट टर्ममध्ये वर्ल्डकप जिंकणे, हेच माझे यापुढील लक्ष्य असणार आहे. त्यादृष्टीने माझी रणनीती असेल’, याचा त्याने तपशीलवार बोलताना खुलासा केला.
हार्दिकचा संघ ज्या-ज्यावेळी प्ले-ऑफमध्ये पोहोचला, त्या-त्यावेळी तो आयपीएल विजेता ठरत आला आहे. यापूर्वी चार वेळा त्याने मुंबई इंडियन्सचा सदस्य या नात्याने आयपीएल जेतेपद अनुभवले. आता कर्णधार या नात्याने त्याच्यासाठी हा पहिलाच आयपीएल विजय आहे. याबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘कर्णधार नात्याने प्रथमच जिंकलो असल्याने यंदाचे आयपीएल जेतेपद अर्थातच खास स्वरुपाचे आहे. पाचवेळा आयपीएल फायनल खेळलो आणि पाचही वेळा जिंकलो, याबद्दल मी स्वतःला सुदैवी मानतो’.
टी-20 फलंदाजांची मक्तेदारी म्हणून ओळखली जात असली तरी गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहरा व हार्दिक पंडय़ा यांचा कल मात्र गोलंदाजांकडे अधिक राहिला आणि पंडय़ाने त्याचाही सविस्तर उल्लेख केला. ‘गोलंदाज सामने जिंकून देऊ शकतात, यावर आमचा ठाम विश्वास आहे. जर आग ओकणारे गोलंदाज संघात असतील तर ते निश्चितच सामन्याचे चित्र पालटू शकतात. माझ्या स्पेलमध्ये दुसऱयाच चेंडूवर संजू सॅमसनला बाद करु शकलो, त्यावेळी योग्य टप्प्यावर मारा केला तर यश मिळू शकते, याची प्रचिती आली. आम्ही प्रत्येक डावात किमान 10 धावा वाचवल्या आणि ही बाब महत्त्वाची ठरली. मजबूत गोलंदाजी लाईनअप उभारणे, हे आमचे लक्ष्य होते आणि त्यादृष्टीने आम्ही रणनीती आखली’, असे तो म्हणाला.
राजस्थानच्या बटलर-चहलसाठी गड आला, पण, सिंह गेला!
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलरने या हंगामात 17 सामन्यात 863 धावांसह ऑरेंज कॅप मिळवली तर याच संघाचा अव्वल फिरकीपटू यजुवेंद्र चहल 27 बळींसह पर्पल कॅपचा मानकरी ठरला. पण, एकाच संघातर्फे दोन्ही कॅप जिंकणारे हे खेळाडू राजस्थानला जेतेपद मात्र मिळवून देऊ शकले नाहीत.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत बटलरनंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल 616 धावांसह दुसऱया स्थानी राहिला. बटलरने डेव्हिड वॉर्नरच्या 848 धावांचा विक्रम मागे टाकत सर्वकालीन आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले.
पर्पल कॅपच्या शर्यतीत चहलने फायनलमध्ये 1 बळी घेत आरसीबीचा फिरकीपटू वणिंदू हसरंगाला मागे टाकले. चहलने या हंगामात 27 तर हसरंगाने 26 बळी घेतले.
गुजरातचे मेंटर गॅरी कर्स्टनकडून पंडय़ावर कौतुकाची बरसात
यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सने जेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतर मेंटर गॅरी कर्स्टनने हार्दिक पंडय़ाच्या नेतृत्वगुणाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. पंडय़ाने अंतिम लढतीत 17 धावात 3 बळी व 34 धावा, असे अष्टपैलू योगदान दिले.
‘कर्णधार या नात्याने हार्दिक पंडय़ाचे आणखी पैलू पाहण्यात आले. पंडय़ा अव्वल दर्जाचा खेळाडू आहेच. पण, त्याही पेक्षा नवनवे कौशल्य आत्मसात करण्याकडे त्याचा असणारा कल मला अधिक भावतो. या स्पर्धेदरम्यान त्याने युवा खेळाडूंना सातत्याने प्रेरणा दिली’, असे कर्स्टनने नमूद केले.
अश्विनने अधिक सुधारणा करण्याची गरज ः कुमार संगकारा
रविचंद्रन अश्विन हा लिजेंड आहे. मात्र, तरीही त्याने आता गोलंदाजीत सुधारणा करण्याची, तसेच कन्व्हेन्शनल ऑफ ब्रेक माऱयावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे, असे निरीक्षण राजस्थान रॉयल्सचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट कुमार संगकाराने मांडले. राजस्थानला गुजरातविरुद्ध आयपीएल फायनलमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर तो बोलत होता.
36 वर्षीय अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे सर्वोच्च बळी घेणाऱया गोलंदाजांच्या यादीत 442 बळींसह दुसऱया स्थानी विराजमान आहे. मात्र, यंदाच्या आयपीएल हंगामात खेळलेल्या 17 सामन्यात त्याला केवळ 12 बळी घेता आले. त्याने गुजरातविरुद्ध फायनलमध्येही रेग्युलेशन ऑफ-स्पिनऐवजी कॅरम बॉल टाकण्यावर अधिक भर दिला. यादरम्यान त्याने 3 षटकात 32 धावा दिल्या आणि विकेटच्या निकषावर त्याची पाटी कोरीच राहिली.
कोट्स
आयपीएलचे विजेतेपद हा मी माझ्या आजवरच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण मानतो. अशा मोठय़ा स्पर्धांमध्ये वरचष्मा गाजवणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. सांघिक स्तरावरील उत्तम योगदानामुळे यंदा आम्ही आयपीएल जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात यशस्वी ठरलो.
-गुजरातचा अव्वल लेगस्पिनर रशिद खान
जोस बटलरला 6 पुरस्कार, उमरान मलिक हंगामातील उदयोन्मुख खेळाडू
राजस्थान रॉयल्सचा स्टार सलामीवीर जोस बटलरने मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, ऑरेंज कॅपसह हंगामात सर्वाधिक षटकार, हंगामातील सर्वाधिक चौकार, हंगामातील पॉवर प्लेयर व हंगामातील गेमचेंजर असे 6 पुरस्कार पटकावले. याशिवाय, सनरायजर्स हैदराबादचा जलद गोलंदाज उमरान मलिक हंगामातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरला.
कोट्स
टायटल विनबद्दल गुजरात टायटन्सचे खास अभिनंदन! पूर्ण हंगामात गुजरातचा संघ निर्विवादपणे सर्वाधिक सातत्य राखण्यात यशस्वी ठरला. विजयासाठी ते खरे हक्कदार ठरले.
-माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर
पार्टी किथे करनी है, नेहराजी! गरबे दे नाल भांगरा वी करेंगे!
-माजी भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग
गुजरात संघ व त्यांच्या सहायक पथकातील सदस्यांचे आयपीएल जेतेपदाबद्दल विशेष अभिनंदन! हार्दिक पंडय़ा, शुभमन गिल यांचे योगदान विशेष महत्त्वाचे ठरले. नेहराजींचेही अभिनंदन!
-माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग
पंडय़ा आजवर तीनवेळा वर्ल्डकपच्या उंबरठय़ावर, पण, प्रत्येक वेळी निराशा!
आजवर हार्दिक पंडय़ा एकूण तीनवेळा भारतीय संघातर्फे वर्ल्डकपच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचला. पण, प्रत्येक वेळी त्याची निराशा झाली. 2016 मध्ये बांगलादेशविरुद्ध 2019 वर्ल्डकप उपांत्य फेरीतील त्याच्या शेवटच्या षटकानेच भारताला अंतिम फेरीत नेले. पण, अंतिम फेरीत भारताला विंडीजविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्यापुढील वर्षात चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पंडय़ाने फटकेबाजी केल्यानंतर देखील भारताला पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. 2019 वर्ल्डकप सेमीफायनलमध्येही पंडय़ा-पंत यांनी पहिले 3 फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावेळी न्यूझीलंडने अखेर बाजी मारली आणि पंडय़ाची तिसऱयांदा निराशा झाली.
जेते-उपजेते, वैयक्तिक पुरस्कार व बक्षिसांचा तपशील
विजेता ः गुजरात टायटन्स (20 कोटी)
उपविजेता ः राजस्थान रॉयल्स (13 कोटी)
तिसरे स्थान ः आरसीबी (7 कोटी)
चौथे स्थान ः लखनौ सुपर जायंट्स (6.5 कोटी)
उदयोन्मुख खेळाडू ः उमरान मलिक (10 लाख)
सर्वाधिक षटकार ः जोस बटलर (10 लाख)
सुपर स्ट्रायकर ः दिनेश कार्तिक (10 लाख, टाटा पंच)
गेमचेंजर अवॉर्डः जोस बटलर (10 लाख)
पॉवर प्लेयर ः जोस बटलर (10 लाख)
सर्वात जलद चेंडू ः लॉकी फर्ग्युसन (10 लाख)
सर्वाधिक धावा ः जोस बटलर (10 लाख)
पर्पल कॅप ः यजुवेंद्र चहल (10 लाख)
ऑरेंज कॅप ः जोस बटलर (10 लाख)
सर्वोत्तम झेल ः इव्हिन लुईस (10 लाख)
एमव्हीपी पुरस्कार ः जोस बटलर (10 लाख)
फेयर प्ले पुरस्कार ः राजस्थान व गुजरात
5625 कोटी गुंतवणुकीच्या संघाला 20 कोटींचे इनाम
गुजरात टायटन्स संघ सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स या ब्रिटीश प्रायव्हेट इक्विटी व इन्वेस्टमेंट ऍडवायझरी फर्मच्या मालकीचा असून या फर्मने 5625 कोटी रुपयांच्या बोलीसह अहमदाबाद प्रँचायझी विकत घेतली. पहिल्याच हंगामात जेतेपद संपादन करणाऱया या संघाला जेतेपदाचे 20 कोटी रुपयांचे इनाम मिळाले.