ग्रामस्थांचे धडक मोर्चाद्वारे ग्रामपंचायतीला निवेदन : येत्या 15 दिवसात विविध विकासकामांना सुरूवात करण्याची मागणी
वार्ताहर /अगसगे
शिवारातील रस्ते आणि ग्रामसभा घेण्यासाठी तसेच विविध विकासकामांबद्दल अगसगे ग्रामस्थांनी मंगळवारी ग्रामपंचायतीला धडक दिली. दरम्यान, आंदोलन छेडून संताप व्यक्त केला. येत्या 15 दिवसात शिवारातील रस्त्यांसह इतर विकासकामांना सुरुवात न झाल्यास ग्रामपंचायतीला घेराव घालून टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याला ग्रामपंचायत अधिकारीच जबाबदार राहतील, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला. ग्रामपंचायतीच्या बेजबाबदारपणामुळे गावातील अनेक विकासकामे खुंटली आहेत. गेल्या दोन वर्षापासून रोजगार हमी योजनेमार्फत अर्धवट झालेली शिवारातील कामे रेंगाळत पडली आहेत. गेल्या 7 वर्षात केवळ 2 ग्रामसभा झाल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांना शासनाच्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. शिवारातील रस्ते केले नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. रोजगार हमी योजनेतून शिवारातील रस्ते व इतर कामे करण्यासाठी भरीव निधी ग्रामपंचायतीला येत आहे. असे असताना ग्रामपंचायतीच्या बेजबाबदारपणामुळे कामे रखडली आहेत. झालेली कामेच दुसऱ्यांदा करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना गरज व आवश्यकता असलेल्या कामांना चालना न देता इतर कामे करतात, असा आरोप यावेळी केला. गावातील हायस्कूलचे क्रीडांगण सपाटीकरण करून द्यावे, अशी मागणी देखील करण्यात आली.
संगणक उताऱ्यासाठी ग्रामस्थांचे हेलपाटे
ग्रामविकास अधिकारी एन. ए. मुजावर यांनी ग्रामपंचायतीचा पदभार दि. 17 जानेवारीला स्वीकारला आहे. जवळपास दीड महिना झाला तरी अद्याप संगणक उतारा देण्यासाठी तालुका पंचायतीमधून डोंगल, थंब मंजूर केले नसल्यामुळे संगणक उताऱ्यासाठी अर्ज केलेले ग्रामस्थ दररोज ग्रामपंचायतीकडे हेलपाटे मारत आहेत. याविषयी पीडीओ यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. सध्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याने गावचा विकास खुंटला आहे, अशी चर्चा यावेळी ग्रामस्थांतून करण्यात आली. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून काकती पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चन्नबसाप्पा सि. यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित होते. य् ाावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष चन्नम्मा तिरमाळे, पीडीओ एन. ए. मुजावर, ग्रा. पं. उपाध्यक्ष भैरु कंग्राळकर, सदस्य अपट्यागौडा पाटील, गुंडू कुरेन्नवर, अमृत मुद्देन्नवर यांना निवेदन देण्यात आले. तसेच आंदोलक सिद्धलिंग मुद्देन्नवर, सिंगाना मुद्देन्नवर, निंगाप्पा कोलकार, सन्नप्पा कोलकार, यल्लाप्पा मेत्री, हणमंत कोलकार, पुंडलिक कोलकार, अपट्या कोलकार, सद्याप्पा कांबळे, परशराम डोणकरी, लक्ष्मण चलवेटकर, परशराम सावंत, बसू मारिहाळ, वैजू मारिहाळ, प्रकाश मुतगेकर, चुडाप्पा कंग्राळकर, सुरेश गडकरी, सेफ वार्ड समुहाचे अध्यक्ष संतोष मेत्री, सामाजिक परिवर्तन वेदिकेचे सेक्रेटरी कलाप्पा मेत्री, चिंतामणी मेत्री, केपीसीसी राज्य सहसचिव शिवपूत्र मेत्री आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने मोर्चाप्रसंगी उपस्थित होते.