विद्यापीठ विकास आघाडीच्या कोअर कमिटीत निर्णय;विद्यापीठ निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
प्रतिनिधी,कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठातील विविध अधिकार मंडळाचे मतदान 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनासह विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक संघटना कामाला लागल्या आहेत.निवडणूक अर्जांची विक्री सुरू असून आतापर्यंत कोणीही अर्ज भरलेला नाही. सुटाने विद्यापीठ विकास आघाडीला एकत्रित निवडणूक लढवण्याची साद दिली होती.यावर सोमवारी डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या विद्यापीठ विकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक झाली.या बैठकीत सुटाबरोबर चर्चा करण्याचा निर्णय झाला असून, तसा निरोप ‘सुटा’ला दिला आहे.
शिवाजी विद्यापीठातील विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीमध्ये विद्यापीठ विकास आघाडीविरूध्द ‘सुटा’हे समिकरण कायम आहे.परंतु शिक्षक मतदारसंघातील जागा सुटाला सोडून इतर जागा तुम्ही लढवा,असा प्रस्ताव सुटाने विद्यापीठ विकास आघाडीला दिला होता.यावर सोमवारी विकास आघाडीच्या कोअर कमिटीची बैठक झाली.या बैठकीत चर्चेअंती विद्यार्थी,शिक्षक आणि विद्यापीठाच्या हितासाठी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय झाला.त्यामुळे सुटाला चर्चेसाठी होकार दिला आहे.
हेही वाचा- Shivaji University Election: ‘सुटा’ची हाक, ‘आघाडी’चा नाही प्रतिसाद
विद्यापीठ विकास आघाडी बुधवारपासून इच्छुकांच्या मुलाखती घेणार
शिवाजी विद्यापीठ निवडणुकीसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन विद्यापीठ विकास आघाडी अंतिम निर्णय घेणार आहे. या मुलाखतींना बुधवारपासून सुरूवात होणार आहे, असा निर्णय विद्यापीठ विकास आघाडी कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. पूरक कागदपत्रांसह मुलाखतीला उपस्थित राहण्याच्या सूचना इच्छुकांना देण्यात आल्या आहेत.
शिक्षक सिनेट व अॅकॅडमीकवर विकास आघाडीने उमेदवार देऊ नये
शिवाजी विद्यापीठ निवडणुकीमध्ये पदवीधर, प्राचार्य, संस्थाचालक व व्यवस्थापनच्या सर्व जागा विद्यापीठ विकास आघाडीकडे असतात. म्हणून त्यांनी शिक्षक सिनेट व अॅकॅडमीकला आपला उमेदवार उभा करून नये, असा प्रस्ताव ‘सुटा’ने विकास आघाडीला दिला आहे. सुटा नेहमीच शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे आघाडीने सुटाच्या मागणीनुसार उमेदवार देऊ नयेत, एवढीच मागणी आहे. अन्यथा सुटाने सर्व जागा लढवण्याची संपूर्ण तयारी केली आहे.
डॉ. आर. के. चव्हाण (अध्यक्ष, सुटा)