ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुत्रप्राप्तीसाठी पुण्यातील एका व्यावसायिकाने अघोरी पूजा करत आपल्या पत्नीला सर्वांसमोर आंघोळ करायला लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासरे आणि मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती शिवराज कोरटकर (वय 36), सासरे राजेंद्र कोरटकर (64), सासू चित्ररेखा कोरटकर (62), आणि मांत्रिक मौलाना बाबा जामदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचे शिवराज कोरटकर यांच्याशी विवाह झाला आहे. विवाहानंतरचे काही दिवस चांगले गेले. त्यानंतर व्यावसायिक पती आणि सासू-सासरे यांच्याकडून पीडितेचा पैशांसाठी छळ करण्यात येऊ लागला. तिचे शारिरीक आणि मानसिक शोषण होऊ लागले. आरोपींनी पीडितेला तिच्या आई-वडिलांकडून लग्नात मिळालेले दागिने आणि फ्लॅटची कागदपत्रे परस्पर बँकेत ठेवली आणि त्यावर बनावट स्वाक्षरी करून 75 लाखांचे कर्ज काढले. वेळोवेळी मारहाण करत पीडितेकडून एक ते दोन कोटी रुपये उकळल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच पीडित महिलेच्या पतीने व्यवसायात भरभराटी आणि पुत्रप्राप्तीसाठी आपल्या पत्नीसोबत अघोरी पूजा केली. या पुजेदरम्यान, तिला सर्वांसमोर आंघोळ करायला लावली. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली असून, आरोपींविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जादूटोणा आणि नरबळी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.