सेव्हन स्टारमध्ये पार्किंगविना ग्राहकांची होतेय गैरसोय
प्रतिनिधी/ सातारा
सातारा बसस्थानकाशेजारील सेव्हन स्टार मॉलमध्ये लाखो रूपये खर्च करून अनेकांनी गाळे खरेदी केले आहेत. पण अद्याप ही वाहनांच्या पार्किंगची कोणतीच सोय नसल्याने याचा मोठा फटका व्यापारावर बसत आहे. यामुळे येथील सेव्हन स्टार मॉलच्या गाळे मालक व गाळेधारक भाडेकरू यांनी मंगळवारी ठिय्या आंदोलन केले. जर लाखो रूपये निधी खर्च करून आम्ही गाळा घेतला असेल तर आम्हाला व आमच्या ग्राहकांच्या वाहनांकरीता पार्किंगची सोय करणे ही गरजेचे आहे, अशी मागणी यावेळी येथील आंदोलकांच्यावतीने करण्यात येत होती.
या परिसरात जर गाडी रस्त्यावर लावली असता पोलिसांची क्रेन येवून गाडी लगेचच घेवून जाण्यात येते. तसेच बाहेरच्या बाजुला अनेक अनधिकृत टपऱया ही उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे आमच्यापर्यंत ग्राहक येत नाहीत, याचा फटका ही आम्हाला तितक्याच प्रमाणात बसतो. या इमारतीच्या दक्षिण भागातील वाहन पार्किंगची जागा एसटी महामंडळाने बंद केली आहे. गाळे विकत घेताना येथे पार्किंगची सुविधा ही आहे असे सांगितले होते. पण एकंदरीत परिस्थिती पाहता आमची पूर्णपणे फसवणूक झाल्याचे दिसत आहे.
त्याचबरोबर एसटी विभागाकडे गेल्यास तुम्ही विकासकांनी तुम्हाला फसविले आहे, त्यामुळे याबाबतची विचारणा तुम्ही विकासकांना जावून विचारा म्हणून सांगण्यात येते. शहर पोलीस स्थानकात ही आंदोलकांनी धाव घेतली पण याबाबत कोणताच तोडगा निघाला नाही, त्यामुळे आज तोडगा निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
व्यावसायिकांचे होतेय नुकसान
सातारा बस्थानकाशेजारील सेव्हन स्टार मॉलमध्ये अनेकांनी व्यावसायांच्या दृष्टीकोनातून गाळ्यांची खरेदी केली आहे. मात्र खरेदीसाठी येणाऱया ग्राहकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली नाही, त्यामुळे व्यावसायिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत आहे. आम्हाला पार्किंगची व्यवस्था मॉलमध्ये करण्यात येणार असल्याचे फक्त आश्वासन देण्यात आले होते, मात्र तशी कोणतीही सुविधा देण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित विकासाने आमची फसवणूक केली असल्याने गाळेधारकांनी आंदोलनाची भूमीका स्वीकारली आहे.