राणी चन्नम्मा चौक परिसरात कडक पोलीस बंदोबस्त : नागरिकांतून तीव्र नाराजी
प्रतिनिधी /बेळगाव
अग्निपथच्या विरोधात तरुण सर्वत्रच रस्त्यावर उतरत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्येही आंदोलन होणार म्हणून राणी चन्नम्मा चौक येथे पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलन करण्याच्या तयारीत असणाऱया काही तरुणांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. यावेळी तरुणांची विचारपूस सुरू असल्यामुळे तरुणांतून तसेच नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
अग्निपथच्या विरोधात संपूर्ण देशामध्ये लाट उसळली आहे. बेळगावमध्येही त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे भव्य मोर्चा निघण्याची भीती प्रशासनाला आणि पोलिसांना होती. मात्र पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप बेळगावमधील जनतेतून होत आहे. रविवारपासूनच सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोमवारी सकाळीच कित्तूर चन्नम्मा चौक येथे बॅरिकेड्स लावून रस्ते अडविण्यात आले होते.
सरदार्स हायस्कूल तसेच कॉलेज परिसरात काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या या तरुणांना खडेबाजार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याचबरोबर कित्तूर चन्नम्मा चौक येथे आलेल्या तरुणांची विचारपूस करून त्यांना ताब्यात घेण्यात येत होते. अग्निपथ विरोधातील आंदोलन चिरडून काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. यामुळे तरुणांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या हक्कासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. असे असताना आंदोलन करण्यास विरोध केला जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. कितीही झाले तरी आम्ही सरकार विरोधात आंदोलन करूच, असा इशारा काही तरुणांनी दिला आहे. शहरामध्ये सर्वत्रच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ड्रोन कॅमेऱयांतून चाचपणी…
शहरातील विविध ठिकाणी आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱयाचा वापर करण्यात आला. पोलिसांनी विविध भागांमध्ये ड्रोनच्या साहाय्याने चाचपणी केली आहे. अनेक ठिकाणी ड्रोन सोडल्याचे पहायला मिळत होते.