ग्रामस्थांची मोठय़ा प्रमाणात उपस्थिती, एकजुटीने विकास घडविणार : सरपंच फातिमा फर्नांडिस
वार्ताहर /खोल
आगोंद पंचायतीची ग्रामसभा आगोंद येथील भूमिपुरुष सभागृहात होऊन त्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पंचायत निवडणुकांनंतर झालेली ही पहिलीच ग्रामसभा असल्याने तसेच पंच म्हणून निवडून आलेले नवे चेहरे व गेल्या काही वर्षांत झालेल्या ग्रामसभांना नागरिकांची रोडावलेली उपस्थिती या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मोठय़ा संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहिले.
व्यासपीठावर सरपंच फातिमा फर्नांडिस, उपसरपंच प्रितल फर्नांडिस, पंच जॉन फर्नांडिस, रामनाथ वेळीप, करुणा फळदेसाई व कॅनिशा फर्नांडिस, सचिव अमोल देसाई यांचा समावेश होता. या ग्रामसभेला स्थानिक आमदार तथा सभापती रमेश तवडकर तसेच पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर यांनीही उपस्थित राहून ग्रामस्थांच्या अडचणी व सूचना ऐकून घेतल्या.
पंचायत प्रभागांतील अंतर्गत रस्ते, अनियमित वीजपुरवठा, दूषित पाणी, कचरा विल्हेवाट, वाचनालयात नवीन पुस्तकांची वानवा, नदीपात्रात साचलेला गाळ व त्यामुळे शेतीवर परिणाम, रस्ते, वीजवाहिन्या, किनाऱयावरील रस्त्याच्या बाबतीत अडवणूक, धवळखाजन-बोरी पुलानजीक गणेशमूर्ती विसर्जनासाठी आवश्यक पायऱयांची सुविधा, आगोंद स्मशानभूमीची दयनीय अवस्था यावर पेदू फर्नांडिस, आफोन्सो कुतिन्हो, सिसिलियो फर्नांडिस, नंदकिशोर फळदेसाई, रॉय फर्नांडिस, नितीन ना. गावकर, नारायण देसाई, शाबा ना. गावकर, जेकॉल फर्नांडिस, आल्बर्ट फर्नांडिस, नवनाथ ना. गावकर, बॅनी फर्नांडिस, आग्नेल फर्नांडिस व अन्य ग्रामस्थांनी आपले विचार व सूचना सादर केल्या.
पंचायत मंडळातील सरपंचांसहित सर्व पंच हे नवे चेहरे आहेत. गेल्या 15 वर्षांतील विकासकामांतील असमतोल लक्षात न घेता आणि सर्वांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देता सत्तास्थानी असलेला भाजप व सभापती रमेश तवडकर यांच्या सहकार्याने आगोंद क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही एकजुटीने कार्य करू. असे सरपंच फातिमा फर्नांडिस यांनी सांगितले. प्रितल फर्नांडिस यांनी आभार मानले.