मानहानीच्या प्रकरणात 23 मे रोजी हजर राहण्याची सूचना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी मागितल्याप्रकरणी गुजरात विद्यापीठाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी अहमदाबाद न्यायालयाने केजरीवाल यांच्यासह आप नेते संजय सिंह यांना समन्स बजावले आहे. 23 मे रोजी न्यायालयात हजर राहण्यास बजावण्यात आले आहे. केजरीवाल आणि संजय सिंह यांनी पंतप्रधान मोदींच्या पदवीच्या मुद्यावरून विद्यापीठाविरोधात अपमानास्पद विधाने केल्याचे म्हटल आहे. गुजरात विद्यापीठाचे कुलसचिव पीयूष पटेल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आयपीसीच्या कलम 500 अन्वये गुन्हा दाखल केला होता. अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत आणि ट्विटर हँडलवर विद्यापीठाविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर अहमदाबाद न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी जयेशभाई चौवटिया यांनी शनिवारी केजरीवाल आणि संजय सिंह यांना समन्स बजावून 23 मे रोजी हजर राहण्यास सांगितले.