Tarun Bharat

अहमदभाई, अमितभाई, आनंदीबेन इत्यादी इत्यादी

राजकारण सारखे बदलत असते. राजकारणात कधी पोकळी राहू शकत नाही तशी राजकीय पक्षांमध्येदेखील. काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या निधनाला दोन वर्षे झाली असताना पक्षातील त्यांची जागा घेण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. सोनिया गांधी या आता काँग्रेस अध्यक्ष नसल्या आणि त्यांच्या जागी आता मल्लिकार्जुन खर्गे आले असले तरी पक्षातील सत्ताकेंद्र हे राहुल गांधीच आहेत. त्यामुळे राहुल यांच्या अतिविश्वासातील जो नेता बनेल तो पुढील ’अहमद पटेल’ बनेल. सोनिया गांधींच्या काळात काँग्रेस जेव्हा केंद्रात सत्तेत होती   तेव्हा प्रत्यक्षात अहमदभाई हेच पक्ष आणि सरकार चालवावयाचे हे एक उघडे गुपित होते. त्यामुळे अहमदभाईंची मर्जी जो संपादन करेल त्याची चांदी असावयाची. याउलट ज्याच्यावर त्यांची वक्रदृष्टी पडेल तो नेता मागे पडावयाचा.

कोविड महामारीत पटेल यांचे निधन झाल्यावर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ हे काही बाबतीत सोनियांचे ’अहमद पटेल’ बनले होते तर कधीकधी ही भूमिका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पार पाडली होती. संसदेसंबंधीच्या बाबींमध्ये खर्गे हे सोनियांचे मुख्य सल्लागार होते. पण अलीकडील काळात काँग्रेसच्या संघटनात्मक बाबतीत कोणाचा जलवा बघायला मिळाला असेल तर तो सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचा. केरळचे वेणुगोपाल हे पक्षसंघटनेमधील राहुल यांचे खासमखास. त्यामुळे पक्षातील ते ‘अहमद पटेल’ बनू पाहत आहेत अशी चर्चा सुरु झाली होती. पक्षातील इतर पदाधिकारी वेणुगोपाल हेच आपले ‘बॉस’ आहेत असे मानू लागले होते.

गेली जवळजवळ तीन महिने राहुल यांची भारत जोडो यात्रा सुरु झाल्यापासून पक्षात एक नवीन गोष्ट घडत आहे. कन्याकुमारीपासूनच या यात्रेला लोकांचा जो प्रतिसाद मिळू लागला आहे. त्याने राहुल यांची प्रतिमा उजळून निघाली आहे तर दुसरीकडे त्यांचे पक्षातील वजनदेखील वाढले आहे. पदयात्रेचा राजकीय लाभ काँग्रेसला कितपत मिळणार हे कळायला वेळ लागणार आहे. पण त्याने राहुलच्या नेतृत्वाला झळाळी जरूर मिळाली आहे. यात्रा नुकतीच मध्यप्रदेशात आली आहे आणि तेथील प्रचंड प्रतिसाद बघून काँग्रेसदेखील एक प्रकारे हैराण झालेले आहेत. हिंदी बोलणारा प्रदेश असल्याने मध्यप्रदेश एका दृष्टीने उत्तरेचा भाग मानला जातो. उत्तेरत काँग्रेस कमकुवत आहे तर मग ही अशी उस्फूर्त गर्दी कशी? असा आगळा प्रश्न पक्ष वर्तुळात चर्चिला जात आहे. गमतीची गोष्ट अशी की आतापर्यंत राहुल यांच्या नावाने नेहेमी खडे फोडणारे बरेच काँग्रेस नेते आता मात्र त्यांचे गुणगान गाताना दिसत आहेत.

यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादाने काँग्रेस पुढील वषी देखील अशी यात्रा काढणार आहे असे बोलले जात आहे. पुढील यात्रा ही पूर्व-पश्चिम असेल आणि गुजरातच्या द्वारकेपासून सुरु होऊन पूर्वोत्तर भारतात जाईल असे सांगितले जाते.

प्रियंका गांधी वद्रा यांनी मध्यप्रदेशमध्ये यात्रेत भाग घेऊन राहुल यांच्या यशात आपले पडेल नेतृत्व निखरवण्याचा प्रयत्न चालवला आहे असे पक्षातील एक गट मानत आहे. गेल्या वषी उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसच्या झालेल्या जबर पानिपतामुळे प्रियांका यांचे खणखणीत मानले गेलेले नाणे प्रत्यक्षात खोटे आहे अशी भावना झालेली आहे.   इम्रान प्रतापगढी, प्रमोद तिवारी आणि राजीव शुक्ला या तीन बिनबुडाच्या नेत्यांना राज्यसभा प्रियांकामुळे मिळाली असे बोलले जात असल्याने पक्षात त्यांच्याविरुद्ध एकप्रकारे रोष देखील बघायला मिळतो. या पार्श्वभूमीवर त्या आपल्या नेतृत्वाच्या डागडुजीच्या कार्यक्रमाला लागल्या आहेत आणि त्याकरिता आपल्या भावाची मदत घेत आहेत असे दिसत आहे.

राजस्थानमध्ये गेहलोत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी सचीन पायलट यांच्यातील वैमनस्य विकोपाला गेलेले आहे. गेल्याच आठवडय़ात एका मुलाखतीत ‘पायलट हे गद्दार आहेत. त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली होती. ते कधीच मुख्यमंत्री बनू शकत नाहीत’, असे सांगून गेहलोत यांनी हल्लाबोल केला होता. ‘गेहलोत आणि पायलट हे दोघेही काँग्रेसचे भूषण आहेत’, असा   निर्वाळा राहुल गांधी यांनी दिल्याने दोघा नेत्यांना तात्पुरती का होईना दिलजमाई करून एकत्र येणे भाग पाडले आहे. यात्रा लवकरच राजस्थानमध्ये प्रवेश करत आहे. गेहलोत आणि पायलट हे दोघेही राहुलसमोर हात जोडून उभे आहेत असे चित्र दिसत आहे.

या यात्रेमध्ये राहुल यांचे एक प्रमुख साथीदार बनलेले माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांची पक्षातील प्रोफाईल अचानक वाढत आहे. ते राहुल यांचे ’अहमद पटेल’ बनण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. काँग्रेसच्या कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख बनल्यापासून रमेश यांनी पक्षाची प्रतिमा मोठी केली आहे. भाजपच्या ‘आरे ला कारे’ कसे   करावयाचे हे त्यांना चांगले माहित झाल्याने सत्ताधारी थोडे अडचणीत आहेत. देवेगौडा सरकारात तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे

ओएसडी असलेले जयराम आता चिदंबरमम यांच्यापुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.काँग्रेसमध्ये असे चित्र दिसत असताना भाजपमध्ये मात्र वेगळेच घडत आहे असे बोलले जात आहे.   गुजरातमध्ये केंद्रीय काँग्रेस नेतृत्व हे प्रचारापासून एक प्रकारे गायब असले तरी   भाजपाला निकराची लढत द्यावी लागत आहे असे आगळेच घडत आहे. अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हा काँग्रेसची मते खाणार की भाजपची याबाबत नीट अंदाज लागत नसल्याने पंतप्रधानांनी प्रचारात जोर लावला आहे आणि कार्यकर्त्यांनी अजिबात गाफील राहू नये, असे आदेश दिले आहेत.

देशभर पंतप्रधानांच्या नंतर नंबर दोनचे नेता असा लौकिक कमावलेले गृहमंत्री अमित शहा यांना आपल्या गृहराज्यात मात्र आनंदीबेन पटेल गटाच्या कलाने घ्यावे लागत आहे असे दिसत आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे आनंदीबेन गटाचे मानले जातात. आनंदीबेन यांच्या पूर्वीच्या मतदारसंघातून लढत असलेले भूपेंद्रभाई हे जसे मोदींना सर्वोच्च नेता मानतात तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल असलेल्या आनंदीबेनना आपला मार्गदर्शक मानतात. 80 पार केलेल्या आनंदीबेन यांची ख्याती ‘आयर्न लेडी ऑफ गुजरात’ अशी आहे. अमितभाई आणि आनंदीबेन मध्ये विस्तव जात नाही. त्यांना राज्यपाल बनवल्यावर अमित शहा यांनी आपले खासमखास विजय रुपांनी यांना अचानक मुख्यमंत्री बनवल्याने ही तेढ अजून वाढली.  भाजप निवडणूक जिंकले तर अचानक आनंदीबेन देखील मुख्यमंत्री बनू शकतात अशी कुजबुज सत्ताधारी वर्तुळात सुरु झाली आहे. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदाचा उमेदवार बनवण्यापूर्वी आनंदीबेनचे नावदेखील त्या पदाकरिता चर्चेत होते. मोदी जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा आनंदीबेनच्या हाती गुजरात देऊन गेले होते. अमितभाईंचा राजकारणात उदय होण्यापूर्वीपासून आनंदीबेन पंतप्रधानांबरोबर काम करत आहेत. गुजरातमध्ये असे अघटित घडले तर तो मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी अमितभाईंना धक्का असेल.   मोदी हे सर्वोच्च नेता आहेत. त्यांच्या जवळ यायचा अथवा तसे भासवायचा देखील कोणी प्रयत्न केला तर शॉक बसू शकतो, असा देखील त्याचा अर्थ
असेल.

अशातच गुजरातमधील निवडणुकीतील पहिल्या फेरीत कमी मतदान झाल्याने त्याचे उलटसुलट अर्थ लावले जात आहेत. भाजपची हिंदुत्वाची प्रयोगशाळा कितपत मजबूत आहेत ते येत्या आठवडय़ात दिसेल. मोदी-शहा यांचे नाणे किती चलती आहे याकडे काही बारीक लक्ष देऊन आहेत.

सुनील गाताडे

Related Stories

ब्रह्मदेवापेक्षा मला भक्त प्रिय आहेत

Patil_p

कम्युनिस्टांचे धोरण असमर्थनीय

Amit Kulkarni

फुकटातले पडले महागात…डेटावर व्हाट्सअपचा अधिकार

Patil_p

नव्या जगातील प्रेमकहाण्या

Patil_p

नागरिकता सुधारणा कायदा (सीएए) : मूळ कारण व काही शंका

Patil_p

कृष्णवियोगाचे दुःख

Patil_p