इरोड पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक
वृत्तसंस्था/ चेन्नई
अण्णाद्रमुकचे वरिष्ठ नेते आणि तामिळनाडूचे माजी मंत्री के.व्ही. रामलिंगम हे इरोड पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक लढविणार आहेत. काँग्रेसचे ई.थिरुमहान एवरा या मतदारसंघाचे आमदार होते. परंतु एवरा यांच्या आकस्मिक निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. वर्तमान राजकीय स्थिती पाहता अण्णाद्रमुकने या मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. तमिळ मनीला काँग्रेसचे नेते जी.के. वासन यांच्यासोबत अण्णाद्रमुकच्या नेत्यांची बैठक झाली आहे. तर पोटनिवडणुकीच्या तयारीकरता तामिळनाडूतील भाजप नेते अण्णाद्रमुकच्या नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. अण्णाद्रमुकचे अंतरिम महासचिव आणि माजी मुख्यमंत्री के. पलानिसामी हे या निवडणुकीला अत्यंत महत्त्वाचे मानत आहेत. पलानिसामी यांच्या नेतृत्वक्षमतेवर या पोटनिवडणुकीच्या निकालातून शिक्कामोर्तब होऊ शकते.