वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सुपरस्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पुढील वर्षी पॅरिसमध्ये होणारे ऑलिम्पिक आणि 2025 मध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेतील विजेतेपदे राखून ठेवणे हे आपले लक्ष्य असल्याचे सांगितले आहे. 25 वर्षीय चोप्रा रविवारी बुडापेस्टमध्ये जागतिक स्पर्धेतील विजेतेपद पटकावल्यानंतर ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धा या दोन्हींमध्ये जेतेपद पटकावणारा इतिहासातील केवळ तिसरा भालाफेकपटू ठरला.
तीन ऑलिम्पिक आणि तीन जागतिक स्पर्धांतील विजेतेपदे जिंकणारा झेक प्रजासत्ताकचा महान अॅथलीट जॅन झेलेझनीचे अनुकरण करू शकणार का असे विचारले असता चोप्रा म्हणाला की, ‘मी प्रेरित राहिलो आणि खेळावर लक्ष केंद्रीत केल, तर सर्व काही शक्य आहे. माझी जेतेपेदे राखून ठेवण्याचा माझा प्रयत्न असेल आणि त्यासाठी मला जे काही कष्ट करावे लागतील ते मी घेईन, असे त्याने सांगितले.
चोप्राने पॅरिस येथे होणार असलेल्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक राखणे हे मोठे आव्हान असल्याचे मान्य केले. टोकियोमध्ये पहिले विजेतेपद जिंकणे हे मोठे आव्हान होते आणि त्याची पुनरावृत्ती करणे हे आणखी मोठे आव्हान असेल कारण प्रत्येक जण तयार होऊन होईल. टोकियो ऑलिम्पिकपेक्षा यावेळी जास्त दडपण असेल. कारण पूर्वीपेक्षा खूप जास्त अपेक्षा असतील, माझ्याही अपेक्षा आहेत, असे त्याने सांगितले.
पण सर्वांत महत्त्वाची गोष्ट स्वत:ला दुखापतींपासून दूर ठेवणे. मी निरोगी आणि दुखापतीमुक्त राहण्याची गरज आहे, जेणेकरून मी माझी सर्व विजेतेपदे राखून ठेवू शकेन, असे चोप्रा म्हणाला. झुरिच डायमंड लीगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या चोप्राने सांगितले की, जागतिक स्पर्धेपूर्वी त्याला खोकला आणि घसादुखीचा त्रास होता.