180 आसन क्षमतेच्या विमानाचा होणार टेक -ऑफ
पाच विमानांच्या पार्किंगला मंजुरी
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर विमानतळाच्या विकासाच्या प्रक्रियेचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. केंद्रीय नागरी विमान उडाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी कोल्हापूर विमानतळावर एअर बससह 72 आसनी क्षमतेच्या विमानांच्या पार्किंगला (ऍपरन) मंजुरी दिली आहे. तसेच आठवडय़ाभरात नाईट लॅडिंग आणि वाढीव रन-वे ला मंजुरी मिळेल. तसेच कोल्हापूर-मुंबई विमानसेवाही लवकरच कार्यान्वित होईल अशी ग्वाही दिली.
खासदार महाडिक यांनी गुरुवारी नागरी विमान उड्डाण मंत्री जोतिरादित्य सिंदीया यांची नवी दिल्लीत भेट घेऊन कोल्हापूर विमानतळाच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकीबाबत सकारात्मक चर्चा केली. नाईट लॅडिंग, वाढीव रन वे तसेच विविध मार्गावरील बंद असलेल्या विमानसेवेची माहिती देत सेवा सुरु करण्याची मागणी केली. यावेळी मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी महाडिक यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कोल्हापूर विमानतळावर एअर बससह चार 72 आसनी विमानांच्या पार्कांगला तातडीने मंजुरी दिली. शिवाय धावपट्टीला लागून टॅक्सीवे आणि आयसोलेशन वे उभारण्यासही मंजुरी देण्यात आली. मंत्री सिंदीया यांनी, कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी आणि हवाई सेवा सुरळीतपणे सुरू होण्यासाठी आवश्यक ती पावले तातडीने उचलू, अशी ग्वाही दिली. यामुळे लवकरच कोल्हापूरातून 180 आसनी विमान सेवा सुरु होणार आहे. विमानांची संख्या वाढून अन्य शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
सध्या कोल्हापूर ते अहमदाबाद ही विमान सेवा आठवडय़ातून तीन दिवस सुरू असून, त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या मार्गावरही रोज विमानसेवासुरू करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. अलायन्स एअरची कोल्हापूर-बेंगलोर विमान सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी या कंपनीला सूचना कराव्यात अशी महाडिक यांनी मागणी केली. नाईट लँडींग करण्यासाठी कोल्हापूर विमानतळ तांत्रिकदृष्टया सज्ज आहे. केंद्रीय समितीने कोल्हापूर विमानतळाची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे नाईट लँडींग परवाना ताबडतोब द्यावा, अशी मागणी महाडिक यांनी केली. तसेच कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीची लांबी 1370 मीटर वरून 1930 मीटर पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या आठवडय़ाभरात या दोन्ही तांत्रीक बाबींना मंजुरी मिळेल, असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला आहे.
कोल्हापूर-मुंबई ,बेंगलोर लवकरच विमानसेवा
कोल्हापूरहून मुंबई, बेंगलोर हवाई सेवा गेल्या काही महिन्यापासून सेवा खंडीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. ट्रुजेटच्या वतीने कोल्हापूर ते मुंबई या मार्गावरील विमानसेवा बंद झाल्यामुळे, तो स्लॉट रिकामा असल्याकडे सिंधया यांचे लक्ष वेधले. इंडिगो एअरलाईन्स या मार्गावर सेवा देण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांना या मार्गासाठी परवानगी देण्याची मागणी केली. त्याला सिंधिया यांनी ताबडतोब मान्यता दिली. यामुळे या विमानसेवा लवकरच सुरु होतील.असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले आहेत.
काय आहे एअर बस
कोल्हापूर विमानतळावर आतापर्यंत 72 आसनी विमानांचे उडाण होत आहे. केंद्रीय नागरी उडाणमंत्री एअर बस म्हणजे 180 आसन क्षमतेचे विमान आणि 72 आसनी चार विमानांच्या पार्किंगला (ऍपरन) मंजुरी दिली आहे. यामुळे कोल्हापूर विमानतळावर एकाचवेळी पाच विमानांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.