वृत्तसंस्था /नवी दिल्ली
येथे आयोजलेल्या राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत गुरूवारी मध्यप्रदेशचा नेमबाज ऐश्वर्य प्रतापसिंग तोमरने पुरूषांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन प्रकारात प्रथम स्थानासह विजेतेपद मिळविले असून हरियाणाचा नेमबाज संजीव रजपूत दुसऱया स्थानावर राहिला.
येथील डॉ. कर्नी सिंग नेमबाजी संकुलात झालेल्या पुरूषांच्या 50 मी. रायफल 3 पोझिशन प्रकारातील सुवर्णपदकाच्या लढतीत तोमरने 404.9 गुणांसह पहिले स्थान तर संजीव रजपूतने 400.7 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. या क्रीडाप्रकारात भारतीय नौदलाच्या जी. पुरूषोत्तमने 395.8 गुणांसह तिसरे स्थान तसेच सेनादलाच्या राजन तोमरने 391 गुणांसह चौथे स्थान मिळविले. या निवड चाचणी स्पर्धेत वरील क्रीडा प्रकारात 101 नेमबाज सहभागी झाले होते.