68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा : मराठी चित्रपट अन् कलाकारांनी मारली बाजी
वृत्तसंस्था / चेन्नई
अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱया राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली आहे. यंदाही राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे. मराठी चित्रपट आणि कलाकारांनी अनेक पुरस्कारांवर स्वतःचे नाव कोरले आहे. अजय देवगण तसेच दाक्षिणात्य स्टार सूर्या यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान मिळाला आहे. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर यांच्या भूमिका असलेला ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार मिळाला आहे.
अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्याकडून निर्मित ‘जून’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ‘गोदाकाठ’ आणि ‘अवांछित’ या दोन चित्रपटांसाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. नॉन फिचर्स फिल्म या विभागात ‘कुंकूमार्चन’ या मराठी चित्रपटाला बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यूचा पुरस्कार जाहीर झाला. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘फनरल’ या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून या पुरस्कारांची घोषणा केली जाते. यंदाचा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार ‘तुलसीदास जूनियर’ला तर बेस्ट फिचर फिल्मचा पुरस्कार ‘सोरारइ पोटारू’ने मिळाला आहे. अजय देवगण (तान्हाजी द अनसंग वॉरियर) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या हे सर्वोत्कृष्ट अभिनेते ठरले आहेत. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दाक्षिणात्य अभिनेत्री अपर्णा बालामुरलीने पटकाविला.
- सर्वोत्कृष्ट अभिनेता : अजय देवगण अन् सूर्या
- सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : तुलसीदार जूनियर
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : अपर्णा बालामुरली (सोरारइ पोटारू)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : बिजू मेनन (अय्यप्पनम कोशियुम)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : सचिदानंदन केआर (अय्यप्पनम कोशियुम)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : लक्ष्मीप्रिया चंद्रमौली
- स्पेशल मेंशन ज्युरी अवॉर्ड : बाल कलाकार वरुण बुद्धदेव
- सर्वाधिक चित्रपटस्नेही राज्य : मध्यप्रदेश
- विशेष उल्लेख असलेले राज्य : उत्तराखंड अन् उत्तरप्रदेश
- सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म : सोरारइ पोटारू
- सर्वात लोकप्रिय चित्रपट : तान्हाजी द अनसंग वॉरियर
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : ननचम्मा
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : राहुल देशपांडे (मी वसंतराव)
- सर्वोत्कृष्ट गीतकार : मनोज मुंतशिर
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : विशाल भारद्वाज (1232 किलोमीटर)
- सर्वोत्कृष्ट तेलगू चित्रपट : कलर फोटो
- सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट : शिवरंजिनियुम इनुम सिला पेंगलु
- सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट : डोळ्ळू
यंदा फिचर फिल्म शेणीत 305 चित्रपटांना नामांकन मिळाले होते. हा पुरस्कार 2020 साली घोषित करण्यात आले आहेत. यंदा फिचर फिल्म ज्युरींचे नेतृत्व चित्रपट निर्माते विपुल शाह यांनी केले. तर पुरस्कारांची घोषणा ज्युरी सदस्य धरम गुलाटी यांनी केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार चालू वर्षाच्या अखेरीस एका सोहळय़ात प्रदान केले जाणार आहेत.