ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आज पुणे दौरा ठरलेला होता. मात्र, हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. अजित पवार मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी मुक्कामी असल्याचे समजते. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत. हे दोन्ही नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. मागील आठवडय़ातही अजित पवार नॉट रिचेबल होते. त्यावेळी त्यांनी आजारी असल्याचे कारण दिले होते. मात्र, आजही त्यांनी पुणे दौरा अचानक रद्द केला. काल नागपुरातील वज्रमूठ सभेत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे दिग्गज नेते आले होते. पण चर्चा झाली अजित पवारांच्या भाजप प्रवेशाची. अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. ते 35 ते 40 आमदार घेऊन भाजपमध्ये जाणार आहेत. त्याची त्यांनी तयारीही केली आहे, अशी चर्चा या मैदानावर सुरू होती.
दरम्यान, आता भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनीही अजित पवारांची प्रशंसा करणे सुरू केले आहे. त्याचा संबंधही त्यांच्या भाजप प्रवेशाशी जोडला जात आहे. त्यामुळे अजित पवारांचं नेमकं चाललंय काय? हे अजून गुलदस्त्यात आहे.
अधिक वाचा : राज्यातून NA टॅक्स पूर्णपणे हटवणार, विखे-पाटलांची घोषणा