ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज विधानसभा अध्यक्षांना याबाबतचे पत्र देण्यात आले असून, औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.
सध्या विरोधी बाकांवर राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांची नावे चर्चेत होती. रविवारी संध्याकाळी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. यावेळी अजित पवारांना विधानसभा विरोधी पक्षनेतेपद द्यावं, अशी मागणी आमदारांनी केली. या पदाला अजितदादा योग्य न्याय देऊ शकतात, असं मत आमदारांनी व्यक्त केलं होतं. अखेर पक्षाने अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. याबाबतचे अधिकृत पत्र विश्वासदर्शक ठराव मतदानानंतर विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे. लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होईल.
आपल्या आगळ्यावेगळया वकृत्त्व शैलीने अजित पवार ओळखले जातात. सत्तेत असताना प्रशासनावर मजबूत पकड होती. प्रशासनात त्यांचा आदरयुक्त धाक होता. यामुळे विरोधी बाकावर बसून ते या पदाला न्याय देऊ शकतील, असे मत आमदारांनी मांडले होते.