ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे (Vasant More) पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे नाराज आहेत. अनेकदा त्यांनी ही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोरे यांच्यासारख्या नेत्याला आपल्या पक्षात सामील करून घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आता वसंत मोरे यांना पक्षप्रवेशाची खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, मोरे राष्ट्रवादीत जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
अजित पवार आणि वसंत मोरे यांची काल एका विवाह सोहळ्यामध्ये भेट झाली. त्यावेळी अजित पवार यांनी वसंत मोरेंशी हस्तांदोलन करत “तात्या कधी येताय… वाट पाहतोय,” असं म्हणत त्यांना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर दिली. मोरे हे पुण्यातील मनसेचा प्रमुख चेहरा आहेत. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांनी ही ऑफर दिली आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे दिल्लीतील नेतृत्वाचे कारस्थान; नाना पटोलेंचा आरोप
वसंत मोरे यांना आपल्याला राष्ट्रवादीकडून ऑफर आल्याचे मान्य केले. पण मी मनसे पक्ष सोडणार नाही, असेही मोरे यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, पुण्यातील पक्षसंघटनेतील अंतर्गत गटबाजी पाहता वसंत मोरे यांचा हा निर्धार आणखी किती दिवस टिकणार, हे पाहणे महत्वाचे ठरेल.