वृत्तसंस्था/ कोलकाता
येथील इडन गार्डन्स मैदानावर मंगळवारपासून सुरू झालेल्या 2023 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बंगाल संघाने आपल्या दर्जेदार गोलंदाजीच्या जोरावर झारखंडला पहिल्या डावात 173 धावात गुंडाळले. बंगाल संघातील वेगवान गोलंदाज आकाशदीपने 4 तर मुकेश कुमारने 3 गडी बाद केले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगालच्या अचूक गोलंदाजीसमोर झारखंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. झारखंडचा पहिला डाव 66.2 षटकात 173 धावात आटोपला. झारखंड संघातील कुमार सुरजने एकाकी लढत देत नाबाद 89 धावा झळकवल्या. बंगालच्या आकाशदीपने 62 धावात 4 तर मुकेश कुमारने 61 धावात 3 गडी बाद केले. इशान पोरलने 26 धावात 1 बळी मिळवला. संक्षिप्त धावफलक ः झारखंड प. डाव 66.2 षटकात सर्वबाद 173 (कुमार सुरज नाबाद 89, आशिषकुमार 12, आकाशदीप 4-62, मुकेश कुमार 3-61, पोरल 1-26).