ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी मारला गेला आहे. ओसामा बिन लादेनच्या खातम्यानंतर अल कायदाची सूत्रे तो सांभाळत होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या वृत्ताला दुजोरा देत 9/11 हल्ल्याचा बदला पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.
काबूलमध्ये सीआयएने रविवारी ड्रोन हल्ला केला. यावेळी दोन क्षेपणास्त्र डागण्यात आली, तेव्हा जवाहिरी एका सुरक्षित घराच्या बाल्कनीत होता. त्यावेळी त्याच्यासोबत कुटुंबातील इतर सदस्यदेखील उपस्थित होते. मात्र, या हल्ल्यात कुटुंबियांना कोणतीही इजा झालेली नाही. पण जवाहिरी मारला गेला.
ओसामा बिन लादेनला अमेरिकेने 11 वर्षांपूर्वी पाकिस्तानातील अबोटाबाद येथे केलेल्या कारवाईत ठार केले होते. त्याचा अयमान अल जवाहिरी अत्यंत खास सहकारी होता. अल जवाहिरीवर अमेरिकेने 25 मिलियन डॉलरच्या बक्षिसाची घोषणा केली होती. त्यानंतर जवाहिरी हा अल कायदाचा प्रमुख झाला होता. जवाहिरीने 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवरील हल्ल्यात वापरण्यात आलेल्या 4 विमानांचे अपहरण करण्यात मदत केली होती. यावेळी झालेल्या सर्वात मोठ्या हल्ल्यात जवळपास तीन हजार लोक मारले गेले होते.
जवाहिरीचा जन्म 19 जून 1957 रोजी इजिप्तमधील एका उच्चभ्रू कुटुंबात झाला होता. त्याचे अरबीसह फ्रेंच भाषेवरही प्रभुत्व होते. तो व्यवसायने डॉक्टर आणि सर्जन होता. पण इजिप्तमधील धर्मनिरपेक्ष सरकारला त्याचा विरोध होता. त्यामुळे त्याने इजिप्शियन इस्लामिक जिहाद (EIJ) या संघटनेची स्थापना केली होती. धर्मनिरपेक्ष सत्ता उलथवून इजिप्तमध्ये इस्लामिक राजवट कायम ठेवण्यासाठी जवाहिरीच्या संघटनेने उद्दिष्ट होते.